
Ahilyanagar politics : राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेचे वारं आहे. केव्हाही ठाकरे बंधूंच्या युतीची थेट बातमी येऊ शकते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातील आणि मनसेतील नेते अन् पदाधिकारी सबुरीनं घेत आहेत. या युतीच्या चर्चांची सत्ताधारी भाजप महायुतीकडून देखील दखल घेतली जात आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते देखील या युतीची घोषणीची वाट पाहत आहेत. या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज आहे. तोच हेरत शिवसेना नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वारं केव्हाही फिरू शकतं, असं सूचक वक्तव्य करत सत्ताधाऱ्यांची झोप उडवण्याचा प्रयत्न केला आहे.
अंबादास दानवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "अनेकजण सत्ताधारी पक्षात जात आहेत. संघटना रेल्वेसारखी असते. तिच्या डब्यातून अनेकजण उतरतात, तर अनेक नव्याने चढतात. म्हणजेच, नव्यानं कुणीतरी येत असतं, हे लक्षात ठेवा, वारं केव्हाही, कसेही फिरू शकतं", असा सूचक इशारा सत्ताधाऱ्यांना दिला.
अंबादास दानवे यांनी महापालिकेत प्रशासकाच्या आडून सत्ताधारी कशी लूट करत आहे, यावर जोरदार हल्ला चढवला. महापालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून सत्ताधारी महायुतीच्या (Mahayuti) हातात रिमोट कंट्रोल आहे. या सत्तेचा वापर कशापद्धतीने केला जातो, महापालिका कशी लुटली जात आहे, ते जनतेला सांगा. आपण काय करणार, हे नंतर सांगूच. इथं रस्ते, वीज, पाणी, गटारीची व्यवस्था यासाठी सत्ताधाऱ्यांनी जनतेला कसं वेठीस धरलं आहे, हे जनतेपर्यंत पोचवा, अशा सूचना अंबादास दानवे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेत सत्तेसाठी सुरूवातील संघटन मजबूत करा, शिवसेना संघटना थांबत नाही, आणि थांबणार देखील नाही, हे मेसेज विरोधकांना द्या. नव्या जुन्याची सांगड घाला, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले. दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी या नगर शहरामध्ये नेतृत्व केलं. ज्या वेळेला मराठवाड्यात नामांतराच्या आंदोलनानंतर अटक झालेल्या शिवसैनिकांना विसापूरला आणले होते. त्यांना राठोडांनी मदत केली होती. नगरमध्ये पंचवीस वर्ष त्यांनी जनतेची सेवा केली. आजही त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असे म्हणत दानवेंनी राठोडांच्या आठवणींना उजाळा दिला.
संघटनेमध्ये काम करताना सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आपण मालक नाही, शिवसैनिक हा मालक आहे, ही भावना सातत्याने लक्षात ठेवा. अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेक जण इतर पक्षांमध्ये गेले. नगरसेवक असो, पदाधिकारी असो. ते आजही शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत. वारं केव्हाही, कसंही फिरतं, हे लक्षात असू द्या, असा टोला अंबादास दानवेंनी लगवाताच, भविष्यात गळालेले काही चेहरे परत शिवसेनेच्या गळाला लागणार काय? अशा चर्चांना तोंड फुटले आहे.
शहरप्रमुख किरण काळे यांनी अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची संघटना उभी आहे. संघटनेला अधिक बळकट करण्याचं काम करायचं आहे. शिवसेना हा नगरकरांचा श्वास असून तो कधीच संपू शकत नाही. सगळ्यांना सोबत घेत आगामी काळामध्ये महापालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करू शकतो, याची आत्तापासूनच शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. मनपावर शिवसेना नक्की भगवा फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.