
Sanjay Raut criticism on police action : केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा अहिल्यानगरमधील राहाता आणि कोपरगाव तालुक्याचा दौरा सुरू केला. अमित शहा काल रात्रीच राहाता इथं मुक्कामी दाखल झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील मंत्रिमंडळासमवेत एकत्रित भोजन घेतले.
या 'डिनर डिप्लोमसी'मध्ये शहा अन् फडणवीस यांच्या उपस्थित राजकीय विषयांना फोडणी बसली. दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठा कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्याबरोबर काहींची धरपकड केल्यानं खासदार संजय राऊत चांगलेच संतापले आहेत.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत, सरकार कोणाला घाबरत आहे? असा प्रश्न केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या नगर दौऱ्या आधी ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकाऱ्यासह अनेक शिवसैनिकांची धरपकड केली आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्त्यावर नोटिसा बजावल्या आहे. सरकार डरपोक आहे. डरकाळ्या फोडणारे नेते घाबरत असतील, तर त्यांनी राज्य करू नये? असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष अन् मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावत स्थानबद्ध केलं आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, मनसेचे तालुकाप्रमुख अनिल गायकवाड आणि आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन केले होते. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तिघांनाही ताब्यात घेतलं आहे.
अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात या तिघांना आणण्यात आलं. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख किरण काळे आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. किरण काळे यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर टिका केली. दरम्यान, आज सकाळी संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत, अमित शहा यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेची दोन हात करून पाहणारे, शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीने फोडणारे, लडाखमध्ये सोनम वांगचुक यांना अटक करणारे, असे आपले देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. अमित शहा येण्याअगोदरच राजकीय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आंदोलन करू नये, काळे झेंडे दाखवू नये, यासाठी त्यांना ताब्यात घेतलं. अटक केली. त्यांना अज्ञातस्थळी नेलं. त्यानंतर अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले."
''मनसे'चे कार्यकर्ते आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या गेल्या, ही भीती कसली वाटते तुम्हाला! लडाखमधील सोनम वांगचुक यांची भीती वाटते, मणिपूरमधील महिलांची भीती वाटते, महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांची भीती वाटते तुम्हाला! इतकी भीती का वाटते? मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे तुम्ही गेला नाहीत, कारण की तिथला शेतकरी तुम्हाला येऊ देणार नाही, याची देखील तुम्हाला भीती वाटते, शेतकरी अंगावर येईल! अशा भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का?,' असा सवाल संजय राऊत यांनी केला.
'लोकशाहीने आम्हाला जाब विचारण्याचा अधिकार दिला आहे, मंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे, मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या आहेत, जाब विचारला गेला आहे, मुंबईत देखील मोरारजी देसाई यांची गाडी अडवली गेली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या गाडीसमोर आंदोलन झाली आहेत. शरद पवार साहेबांच्या गाडीसमोर आंदोलन झाली आहेत. हे होत असतं लोकशाहीमध्ये, गुजरात मॉडेलच्या पद्धतीने महाराष्ट्रावर आणि देशावर राज्य करत आहे, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे,' असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केला.
दरम्यान, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना, एका वाक्यात खिल्ली उडवली आहे. 'संजय राऊत बोलत असतात, आपण करमणूक करून घ्यायची', असा एका वाक्यात मोहोळ यांनी टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.