Amit Shah News: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणजे पक्षावर घट्ट पकड आणि जरब असलेले नेते. भल्याभल्यांना त्यांच्यापुढे तोंड उघडता येत नाही. मात्र नाशिकच्या दौऱ्यात शहा यांनी चक्क नेत्यांना गोंजारले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसात श्री शहा यांनी नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि त्यानंतर कोकण असा दौरा करून ते दिल्लीला परतणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपला जमिनीवर आणण्याचे काम महाराष्ट्राने केले. गेल्या निवडणुकीत युतीसह भाजपचे ४३ खासदार होते ही संख्या आता १७ झाली आहे. त्यामुळे राज्यातील पदाधिकारी आणि आमदारांनाही महायुतीच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाताना मनातून काहीशी चिंता जाणवत असावी. ही भावना कुशल संघटक असलेल्या शाह यांनी अचूक टिपली आहे
नाशिक येथील बैठकीमध्ये मोजक्या वरिष्ठ नेत्यांनी आपली भाषणे केली यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते होते.
उत्तर महाराष्ट्राची बैठक नाशिकला झाली. यामध्ये ५४ तालुक्यातील ४७ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत यातील सर्वाधिक जागा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीकडे होत्या. आता यातील काही आमदारांना पक्षांतराचे वेध लागले आहेत.
त्यामुळे कार्यकर्ते आणि नेते यांना शहा यांनी आपल्या भाषणातून सातत्याने भाजप निवडणूक कसा जिंकू शकतो. लोकसभेत महाविकास आघाडी कशी काठावर पास झाली आहे. प्रत्येक पन्ना आणि बूथ केंद्र प्रमुखाने थोडेच परिश्रम केले तर भाजपची सत्ता महाराष्ट्रात पुन्हा येणार आहे. हे सांगण्यावर भर दिला.
श्री. शाह यांनी हे सांगतानाच कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण कसा होईल, यावर भर दिला होता. हे या बैठकीचे वेगळेपण म्हणता येईल. एरवी भाजप आणि त्याचे नेते आक्रमक आणि व विरोधी पक्षांना विशेषतः काँग्रेस आणि शरद पवार यांना हिनवताना दिसत असत. आज मात्र त्यांना ही आघाडी आपली प्रमुख स्पर्धक आहे. हे मनोमन मान्य झाले आहे, असे जाणवत होते.
उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे सहा मंत्री आहेत. यातील महसूल मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे आहेत. उर्वरित तीन मंत्री सहकारी पक्षांचे आहेत. हे सहा मंत्री असतानाही लोकसभेच्या आठ पैकी सहा जागांवर महायुतीचा पराभव झाला आहे.
विधानसभेला भाजप सामोरे जाणार आहे. लोकसभेची हवा विधानसभेत टिकून राहीलच याची शाश्वती नाही. नेमका हाच धागा पकडून श्री. शाह यांची व्यक्तिगत आणि पर्यायी अशी एक मोठी यंत्रणा महाराष्ट्रात कार्यरत झाली आहे. या यंत्रणेकडून येणाऱ्या फीडबॅक वर भाजप विधानसभेला सामोरे जाणार आहे.
भाजपचे मूळ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांना निवडणूक जिंकण्याचे कौशल्य आणि तंत्र शहा यांनी अतिशय सौम्य भाषेत सांगितले. प्रत्येक कार्यकर्ता आणि त्याने आपल्या शेजारच्या दोन कुटुंबांचे मतदान करून घ्यावे. विरोधकांचे कार्यकर्ते फोडा यावर पुन्हा एकदा त्यांनी भर दिला. हा मंत्र यै बैठकीत देण्यात आला.
नाशिक येथे झालेल्या शहा यांच्या उपस्थितीतील बैठकीत नेहमीची करड्या शिस्ती ऐवजी पाठीवर हात फिरवणारा नेता, असे दिसून आले. हे या बैठकीत प्रामुख्याने जाणवलेले वेगळेपण होते. पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीने ते ऊर्जा देणारे होते. श्री. शाह नाशिकच्या नेते, पदाधिकारी आणि इच्छुकांना ही आत्मविश्वास वाढविणारे होते. त्याचे वास्तवात कसे रूपांतर होते, हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.