Niphad Constituency: निफाड विधानसभा मतदारसंघाची आगामी विधानसभा निवडणूक विद्यमान आमदार आणि माजी आमदारांच्या राजकीय अस्तित्वाची असेल. त्या दृष्टीने या दोघांचेही विरोधक आणि समर्थक देखील सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कोणता फॅक्टर निर्णायक ठरेल याची उत्सुकता आहे.
निफाड विधानसभा मतदारसंघावर यंदा महायुतीचा घटक असुनही भाजपने दावा केला आहे. येथे महायुतीचेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप बनकर विद्यमान आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यामुळे सावध आहेत. दुसरीकडे आपला पारंपारिक मतदार असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे महाविकास आघाडीचे पक्ष देखील बारीक लक्ष ठेऊन आहेत.
या मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार दिलीप बनकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम या पारंपरिक लढतीतला छेद बसणार आहे. भाजपने गतवर्षी आमदार कदम यांचे स्वप्न अभंग केलेल्या यतीन कदम यांना ताकद दिली आहे. भाजपने यंदा येथे उमेदवारीचा ठराव केला आहे.
एकाच वेळी अनिल कदम यांना भाऊबंदकीचा तर आमदार बनकर यांना महायुतीतील बंडखोरीच्या डोकेदुखीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेचया दोन्ही परंपरागत या दोन्ही आजी-माजी आमदारांच्या दृष्टीने यंदाची निवडणूक अस्तित्वाची आहे.
दोन्ही पारंपरीक नेत्यांच्या मतदानात यंदा अनेकांनी शेज लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने राजकीय पावले पडत आहेत. यामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याने झाला आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १८ जुलैला झालेल्या (कै) मालोजीराव मोगल जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात राजेंद्र मोगल यांच्या पाठीशी उभे रहा असे विधान केले होते. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय आणि उमेदवार माजी आमदार अनिल कदम की राजेंद्र मोगल असा संभ्रम आहे हा संभ्रम अद्याप दूर झालेला नाही.
यंदा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही निवडणूकीची तयारी केली आहे. याशिवाय आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने गुरुदेव कांदे यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे.
श्री क्षीरसागर सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवारी केल्यास त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसेल. यतीन कदम सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांनी उमेदवारी केल्यास त्याचा फटका यंदा विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना जास्त असेल. कारण भाजपचा एक गट त्यांच्या पाठीशी आहे.
श्री कांदे यांची उमेदवारी मतदारसंघातील गोदाकाठच्या वंजारी समाजाच्या जोरावर असेल. हा समाज श्री कांदे यांना कितपत पाठिंबा देतो, यावर देखील निवडणुकीचे गणित ठरणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार बनकर यांना ९४ हजार मते होती. शिवसेनेचे माजी आमदार कदम यांना सुमारे ७८ हजार मते होती. माजी आमदार कदम यांचे पुतणे येथील यतीन कदम यांना २४ हजार मते होती. यतीन कदम यांना मिळालेल्या मतांमुळे माजी आमदार कदम यांची मत विभागणी झाली. त्यात आमदार बनकर विजयी झाले.
यंदा यतीन कदम यांच्या मदतीला त्यांच्या पारंपारिक ओझर परिसरातील मतदारांबरोबरच भाजपचे बहुतांशी लोक उभे आहेत. ही मतविभागणी महायुतीच्या मार्गात अडसर ठरेल. सध्या तरी महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीवरून एकोपा निर्माण होईल असे चित्र नाही. भाजपने उमेदवारीचा ठराव देखील केला आहे. या सर्व राजकीय घडामोडी महायुतीच्या मतांची विभागणी झाल्यास ज्येष्ठ नेते शरद पवार हा फॅक्टर सर्वात प्रभावी ठरू शकेल. हा चर्चेचा नवा विषय देऊन गेला आहे.
महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी जागावाटप आणि उमेदवार या दोन्हींबाबत चांगला समन्वय आहे. श्री पवार यातील बहुतांश इच्छुकांना शांत करू शकतील. अशा स्थितीत महायुतीत समन्वय निर्माण करणे आमदार बनकर यांचे मुख्य काम असेल. एकंदरच या निवडणुकीत विद्यमान आमदार बनकर आणि माजी आमदार कदम यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढाई असेल.
------
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.