नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या (Graduate constituency election) निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर सोमवारी कार्यकर्ते, नेत्यांत चुरशीचे वातावरण होते, मतदारांत निरुत्साह दिसला. दोन्ही गटांकडून मतदारांना आवाहन केले जात होते. शहरात निरूत्साह तर ग्रामीण भागात उत्साह होता. ४९.२८ टक्के मतदान झाले. त्यात पाच टक्के घट झाली. मतदारांतील हा निरूत्साह कोणाच्या पत्थ्यावर पडणार याची उत्सुकता आहे. (Who will get benifit of decline voting percentage in Nashik)
अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यासाठी विविध संघटनांचे शिक्षक नेते, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी केंद्रावर तळ ठोकून होते. पदवीधरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने ग्रामीण भागात ५३ टक्के मतदान झाले. घटलेले मतदान व निरूत्साहाचा फटका शुभांगी पाटील यांना बसेल की प्रस्थापित तांबे त्याचा लाभ घेतील याची उत्सुकता आहे.
सोमवार सकाळपासून येवल्यात कार्यकर्त्यांच्या गर्दीने मतदान केंद्र फुलून गेले होते. येथील स्वामी मुक्तानंद शाळेच्या केंद्रांच्या प्रवेशद्वारावर दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतदारांना विनंत्या करून उमेदवाराकडे लक्ष देण्याचे आवाहन करत होते. राज्यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत राहिला. शिवाय येथील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही शुभांगी पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केल्याने चुरस वाढली होती.
महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी सोमवारी येथील मतदान केंद्राला भेट दिली तसेच कोटमगाव येथील देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रातून पहिली महिला पदवीधर आमदार म्हणून सभागृहात जाऊ दे, असे देवीला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.
येवल्यातील मतदान केंद्रावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर देशमुख आदी शुभांगी पाटील यांच्या समर्थनार्थ दिवसभर उपस्थित होते, तर तांबे यांच्यासाठी शिक्षक नेते अर्जुन कोकाटे, एम. पी. गायकवाड, दत्तात्रय नागडेकर, संदीप मोरे आदींनी उपस्थित राहून मतदारांना साकडे घातले.
येवल्यात ५२.६७ टक्के मतदान
येवला, जळगाव नेऊर व नगरसुल या तीन केंद्रावर मिळून ५२.६७ टक्के मतदान झाले. तीन हजार १५ मतदारांपैकी एक हजार ५८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील दोन बूथपैकी एका बुथवर तब्बल ६२.४८ टक्के मतदान झाले. तहसीलदार प्रमोद हिले यांच्यासह निवडणूक शाखेने संपूर्ण नियोजन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.