

Nashik Crime News : नाशिकमधील भोंदू व वासनांध अशोक खरात याचा पोलिस कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. तिसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज मंगळवार (दि. १४) अशोक खरातला सुरक्षेच्या कारणास्तव 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर दाखल चौथ्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खरातला 18 एप्रिलपर्यंत (5 दिवसांची) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सोमवारी तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र याचवेळी चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला ताब्यात घेण्याची सरकारी वकिलांची मागणी न्यायालयाने मंजूर केली होती. त्यानुसार मंगळवारी चौथ्या गुन्ह्याप्रकरणी खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी खरातच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध केला मात्र दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकुन न्यायालयाने त्याला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
गेल्या २५ दिवसांपासून खरात पोलिस कोठडीत आहे. त्याला आतापर्यंत आठ वेळा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. त्याला पोलिस कोठडीतून बाहेर काढण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी त्याचे वकिल प्रयत्नशील आहे. मात्र, सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी जोरदार युक्तीवाद करत न्यायालयात खरातने केलेला गुन्हा किती गंभीर स्वरुपाचा आहे त्यावर बाजू मांडली.
त्यांनी सांगितले की, खरात हा स्वतःला दैवी अवतार म्हणवून घेत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. आपल्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांना तो तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि पेढा खाऊ घालायचा, ज्यात गुंगीचे औषध मिसळलेले असायचे. मी देवाचा अवतार आहे. माझ्याशी संबंध ठेवल्याने तू पवित्र झाली आहे, असे सांगून तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा. गुंगीच्या औषधात नेमके काय मिसळले जात होते आणि या भोंदूगिरीसाठी तो कोणत्या रत्नांचा वापर करत होता, या बाबींचा तपास करण्यासाठी 5 दिवसांच्या कोठडीची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान खरातचे वकील ॲड. सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध केला. खरातवर दाखल मागील तीन गुन्ह्यांमध्येही पोलिसांनी असाच युक्तिवाद केला होता. त्यामुळे काय द्रव दिले तो तपास झालेला आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही असा युक्तीवाद त्यांनी केला. मात्र, सरकारी पक्षाने हा गुन्हा वेगळ्या महिलेशी संबंधित असून तपास महत्त्वाचा असल्याचे सांगितल्याने न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी मंजूर केली.
खरातवर दाखल चौथा गुन्हाही गंभीर स्वरूपाचा आहे. नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियमान्वे त्याच्यावर २३ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल आहे. कौटुंबिक अडचणी सोडवण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे गेलेल्या महिलेचा विश्वास संपादन करून तिचे शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार या गुन्ह्यात समोर आला आहे. पोलिसांनी अंधश्रद्धा, फसवणूक व मानसिक-शारीरिक छळाचा गुन्हा नोंदवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.