MNS Nashik News: नाशिक महापालिकेच्या प्रशासनावर मनसे चांगलीच संतापली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. त्यामुळे आता संतप्त मनसे महापालिकेच्या प्रशासनाला आपली स्टाईल दाखवणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन नुकतेच झाले. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्र संग्रहालयाची दुरावस्था झाल्याचे पुढे आले आहे.
सीएसआर योजनेतून उभारलेल्या या प्रकल्पाची महापालिकेला देखभाल देखील करता आलेली नाही. त्यामुळे या संग्रहालयाची दुरावस्था झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. याचमुळे महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यावर मनसे चांगलीच भडकली आहे.
मनसेच्या सत्ता काळात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेचा निधी न वापरता अनेक चांगले प्रकल्प साकारण्यात आले. उद्योग व अन्य संस्थांच्या मदतीने सीएसआर फंडातून हे प्रकल्प करण्यात आले होते.
यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचे संग्रहालय उभारण्यात आले होते. या संग्रहालयाची गेल्या सहा वर्षात दुरावस्था झाली. विशेष म्हणजे डागडुजीच्या नावाखाली राज ठाकरे यांच्या नावाची कोनशीला येथून हलविण्यात आली आहे.
वारंवार मागणी करूनही ती पुन्हा लावण्यात आली नाही. त्यामुळे मनसेचे पदाधिकारी चांगलेच संतापले. या पदाधिकाऱ्यांनी थेट शहर अभियंता कार्यालय गाठले. ही कोनशीला तातडीने पूर्ववत न बसविल्यास मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल. महापालिकेला मनसेची ही स्टाइल झेपेल का? असा सवाल या नेत्यांनी केला.
पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीएसआर फंडाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम उभारण्यात आले. त्यात उद्योगपती रतन टाटा यांचा देखील समावेश होता. यामध्ये बॉटनिकल गार्डन, लेझर शो, चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क, होळकर पुलाखाली इंद्रधनुष्य दिसणारे कारंजे, गोदापार्क, खत प्रकल्पाचे नूतनीकरण, मुंबई नाका वाहतूक बेटाचे सुशोभीकरण, जलशुद्धीकरण प्रकल्प, मुकणे धरण जलवाहिनी आदी बारा प्रकल्पांचा त्यात समावेश आहे.
मनसेच्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत होती. या कालावधीत हे सर्व प्रकल्प बंद पडले आहेत. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रशासकांना देखील या प्रकल्पांची देखभाल करण्यात स्वारस्य नाही, असे चित्र आहे. त्यामुळे आता त्यांची दुरावस्था झाली आहे.
शहराच्या सुशोभीकरणात आणि प्रतिष्ठित भर घालणाऱ्या या प्रकल्पांची दुरावस्था नागरिकांनाही सलते आहे. त्यामुळे आता मनसेनेच त्यासाठी पुढाकार घेत महापालिकेला आपली स्टाईल दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेते, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
माजी महापौर मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, बंटी कोरडे, रोहन देशपांडे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी शहर अभियंत्यांची भेट घेतली.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.