Ahmednagar News : कोपरगाव आणि शिर्डी (ता. राहाता) येथे मंजूर झालेल्या 'एमआयडीसी'वरून नगर उत्तरमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी आम्ही पाच वर्षांपासून पाठपुरावा केल्याने ही एमआयडीसी मंजूर झाल्याचा दावा केला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना जहरी टीका केली. 'खोट बोलायचे पण रेटून बोलायचे', अशा शब्दांत आमदार काळेंनी फटकारले आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात नगर जिल्ह्यातील नगर उत्तरमध्ये कोपरगाव आणि राहाता तालुक्यांत एमआयडीसी मंजूर झाली आहे. कोपरगावमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी एमआयडीसी मंजुरीचा जल्लोष केला. फटाके आणि पेढे वाटले. यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आम्ही पाच वर्षांपासून 'एमआयडीसी'साठी पाठपुरावा केल्याचा दावा केला. तशी पत्रकार परिषदेत कागदपत्रे दाखवली. कोणत्याही नेत्यांनी याचे श्रेय घेऊ नये, असे म्हणत विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार आशुतोष काळे यांचा नामोल्लेख करत हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी यावरून विरोधकांना फटकारले आहे.
आमदार काळे म्हणाले, "समोरच्यांचे खूपच अवघड आहे. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे, अशी गत आहे. सर्वसामान्य कोपरगावकरांना कोण काम करतात आणि कोण स्टंटबाजी करतात, हे माहीत आहे. परंतु कोपरगाव आणि राहाता येथे एमआयडीसी मंजूर होणे खूपच गरजेचे होते. महायुती सरकारने विकासाच्या दृष्टीने टाकलेल्या पाऊलांचे स्वागत करतो. आमच्या पाठपुरावा यश आले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेविषयी आभार मानतो".
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभा 2019 च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एमआयडीसी उभारणार असे वचन दिले होते. या वचनाची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची 14 मार्च 2020 मध्ये भेट घेतली. कोपरगावमधील एमआयडीसी किती गरजेची आहे, यावर चर्चा करत निवेदन दिले. यानंतर पुन्हा 27 जुलै 2023 मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन एमआयडीसीसंदर्भात पाठपुरावा केला. उद्योगमंत्री सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोपरगाव आणि राहाता येथे एमआयडीसी मंजुरीचा निर्णय झाल्याची घोषणा झाल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगतिले.
Edited By Sachin Fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.