Ahilyanagar News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा पेच सोडवण्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी यशस्वी होताना दिसत आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र युवा नेते विवेक कोल्हे यांची थेट दिल्लीत भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतर कोपरगावमधील काळे-कोल्हे यांचा अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष थांबणार, असे दिसते आहे.
या बैठकीत कोल्हे मायलेकांनी भाजपवर एकनिष्ठपणा दाखवल्याने अमित शाह यांनी त्यांच्यासाठी दिल्लीचा मार्ग प्रशस्त केल्याचा शब्द दिल्याचे बोलले जात आहे. पण राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. त्यामुळे अमित शाह यांनी कोल्हेंना कोणता 'शब्द' दिला आणि हा 'शब्द' पुढे किती काळापर्यंत टिकतो, याची चर्चा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात रंगली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. महायुतीमधील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यात जागा वाटपावरून पेच निर्माण झाला होता.
भाजपचे कोल्हे यांनी जागेवार दावा कायम ठेवला होता. परंतु राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असल्याने आणि विवेक कोल्हे यावेळी भाजपकडून इच्छुक असल्याने ही कोंडी फोडण्यासाठी भाजप नेते आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला.
कोपरगावमधील काळे-कोल्हे घरण्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या संघर्षात महायुतीचे नुकसान नको म्हणून आणि विवेक कोल्हे यांच्यासारखा युवा चेहरा सोडून चालणार नाही हे लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीतून भाजपचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना बोलावून घेत स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा घडवून आणली.
यानंतर थेट दिल्लीत भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थानी विवेक कोल्हे आणि त्यांच्या मातुश्री स्नेहलता कोल्हे यांची बैठक झाली. ही बैठक विवेक कोल्हे यांच्या दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ करण्याच्या दृष्टीने फलदायी झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी विवेक कोल्हे यांची मनधरणी करण्यासाठी 'सागर' बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तब्बत पाच तास आमदार काळे 'सागर' बंगल्यावर तळ ठोकून होते, असे सांगितले जात आहे.
विवेक कोल्हे यांचा गेल्या काही वर्षातील राजकीय संघर्ष वाखणण्याजोगा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मातुश्री स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्यानंतर विवेक कोल्हे राजकीय संघर्षासाठी मैदानात उतरले. त्यांनी थेट भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांना आव्हान देण्यास सुरवात केली. या राजकीय संघर्षात त्यांनी विरोधकांना खुबीनं बरोबर घेतले. सहकारी साखर कारखाना, ग्रामपचंयात निवडणुका, शिर्डी देवस्थानमधील कर्मचारी सोसायटीची निवडणुकींमध्ये यश मिळवत मंत्री विखे यांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान दिलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक शिक्षक मतदार संघातील आमदार किशोर दराडे यांना देखील आव्हान दिलं होते. शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत विवेक कोल्हे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विद्यमान आमदार आशुतोष काळेंना विधानसभा निवडणुकीत आव्हान देण्याची तयारी आहे. हाच पेच सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मध्यस्थी करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.