
Ahilyanagar News : गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात सर्व डाव अजमावलेले भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना निवडणुकीचा निकालात धक्का बसेल, असा अंदाज आहे.
'एक्झिट पोल'नुसार त्यांचा पराभव होताना दिसत असताना, राज्याचे नेतृत्वाच्या तयारी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार त्यांचा गड राखण्यात यशस्वी ठरताना दिसतील, असा अंदाज आहे. एक्झिट पोल काहीही असू, पण उद्या मतमोजणीला मज्जा येईल, अशी चर्चा कर्जत-जामखेड मतदारसंघात रंगली आहे.
रोहित पवार यांनी 2019 मध्ये पालकमंत्री असलेला राम शिंदे यांचा पराभव केला होता. हा पराभव शिंदे यांच्या चांगल्याच जिव्हारी लागला आहे. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राम शिंदे यांना पराभवाचा वचपा घेण्यासाठी यंदा पुन्हा संधी दिली गेली. तत्पूर्वी त्यांना विधानपरिषदेवर आमदार करण्यात आला. ही ताकद घेऊन आता यंदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांच्याविरोधात राम शिंदे उभे राहिले आहेत. त्यामुळे निकालाची उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून राम शिंदे असणार असे चित्र स्पष्ट होते. त्यामुळे इथं दुरंगी लढत होईल, अशीच चर्चा होती. राम शिंदे आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे. कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीवरून रंगलेले राजकारण देखील यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. यामुळे निवडणुकीत राजकीय डाव रंगणार, असेच चित्र होते. त्यानुसार अर्ज भरण्यापासून ते प्रचारापर्यंत, पुढे मतदानापर्यंत आणि मतदान झाल्यानंतर देखील दोन्ही बाजूने राजकीय कुरघोड्या सुरूच आहेत.
दोन्ही बाजूने एकमेकांना शह देण्यासाठी साधर्म्य असलेले उमेदवार ईव्हीएम मशीनवर आणले गेले. तिथं ही निवडणूक रंगणार असे संदेश गेला. साधर्म्य असलेले दोन्ही बाजूच्या एकाही उमेदवारांनी माघार घेतली नाही, हे विशेष. पुढे प्रचारातून एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका सुरू झाले. भाजपच्या प्रचारात शिवराळ भाषा आल्याने रोहित पवार यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची माहिला आघाडी मैदानात उतरली.
भाजपने नितीन गडकरी यांनी सभेत महामार्गाचे श्रेय रोहित पवार यांनी कसे घेतले गेले, यावर भाष्य केले. रोहित पवार यांनी त्यावर गडकरी यांना ऐनवेळेला चिठ्ठी देऊन हे भाष्य करायला लावले, असा आरोप केला. मतदानाच्या दिवशी एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे पैसे वाटपाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करण्यात आले. पोलिसांपर्यंत प्रकरण गेलीत. निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्यात. पुढे या तक्रारींवर काय होईल, त्या दप्तरीच पडून राहतील, हे निवडणूक आयोगालाच माहिती.
रोहित पवार यांनी आता ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुमवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यामुळे मतमोजणीची आणि निकालाची उत्सुकता वाढली आहे. तत्पूर्वी साम टीव्ही चॅनलच्या एक्झिट पोलनुसार भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांना धक्का बसेल, असा अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला, तरी राम शिंदे हे आमदारच राहणार आहेत. पण रोहित पवार यांच्या बाजूने कल गेल्यास नेतृत्वावर मोठा शिक्कामोर्तब होईल, असे देखील सांगितले जात आहे.त्यामुळे रोहित पवार यांच्या राज्याच्या नेतृत्वाच्या अस्तित्वाची ही लढाई असून, निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.