Baban gholap News: देवळाली मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने योगेश घोलप यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर लगेचच माजी मंत्री बबन घोलप यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा राजीनामा देत `शब्द` पाळला आहे.
देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार होती. या मतदारसंघात गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या विजयी झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता.
यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लक्ष्मण मंडाले यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती. मात्र शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आक्रमक होत हा शिवसेनेचा गेली ३० वर्ष परंपरागत बालेकिल्ला आहे. त्यामुळे पक्षाने माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.
देवळाली मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा, असा हट्ट नेत्यांनी धरला. त्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र शिवसेनेला हा मतदारसंघ घेण्याआधी आणि योगेश घोलप यांना उमेदवारी देण्याआधी बऱ्याच घडामोडी घडल्या.
शिवसेनेचे नेते शरद पवार यांना भेटले होते. तेव्हा आधी घोलप कुटुंब एकत्र आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. घोलप कुटुंबीयांनी एकत्र यावे, अशी सूचना करण्यात आली. शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील माजी मंत्री घोलप यांनी शिंदे यांच्या पक्षातून राजीनामा द्यावा, अशी सूचना केली होती.
त्या सूचनेनुसारच माजी मंत्री घोलप यांनी आज शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी मुलाला उमेदवारी मिळाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उपकार मानले. त्यांच्या या बोलक्या पत्राने कार्यकर्त्यांना देखील एक संदेश गेला आहे.
माजी मंत्री घोलप यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. चर्मकार समाजाच्या विविध समस्या आणि मागण्या होत्या. त्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती. त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र त्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.
त्यामुळे समाज नाराज आहे. समाजाच्या दबावामुळेच आपल्याला पक्षाचा राजीनामा द्यावा लागत आहे, असे शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे. त्याद्वारे माझ्यावर ठाकरे यांनी उपकार केले, अशी कृतज्ञता देखील माजी मंत्री घोलप यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री घोलप यांनी शिंदे पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देवळाली मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्र येत त्यांना काम करावे लागणार आहे. घोलप गेली १९९० ते २०१४ अशी २५ वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा लाभ होईल, अशी स्थिती आहे.
माजी मंत्री घोलप यांना सर्वात आधी नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधावा लागणार आहे. त्यात ते किती यशस्वी होतात, हे लवकरच स्पष्ट होईल.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.