Bhuse Vs Hire News: जेव्हा जवळचे सहकारीच दुरावतात, तेव्हा भल्याभल्यांची अडचण होते. मालेगाव बाह्य मतदारसंघात मंत्री दादा भुसे यांना सध्या तो अनुभव घेत आहेत. त्यामुळे मतदारांसाठीही यंदाची निवडणूक रंगतदार झाली आहे.
शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांना अपेक्षेप्रमाणे मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे आणि हिरे यांच्यात होणारी ही पारंपारिक राजकीय लढत आहे. मात्र यंदा या लढतीला अतिशय वेगळे वळण लागले आहे.
या मतदारसंघातून यंदा बारा बलुतेदार संघटनेचे बंडू काका बच्छाव यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. श्री. बच्छाव यांनी उमेदवारी करताना गेली सहा महिने अतिशय नियोजनपूर्वक तयारी केली. त्यांनी भुसे यांच्या सर्व विरोधकांना एकत्र करून आपलेसे केले आहे.
हे सर्व विरोधक आता बच्छाव यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे पक्षीय उमेदवारी नसली तरीही अपक्ष उमेदवार बच्छाव यांची दावेदारी भक्कम झाली आहे. मंत्री भुसे यांची यंदाच्या निवडणुकीत वाट रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या निवडणुकीला एक अतिशय संवेदनशील संदर्भ आहे. मंत्री दादा भुसे यांनी सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली. या प्रत्येक निवडणुकीत बंडू काका बच्छाव हे त्यांचे प्रचार प्रमुख होते. श्री बच्छाव आणि मंत्री दादा भुसे यांची मैत्री अतिशय चर्चित होती. मात्र गेल्या दोन वर्षात या मित्रांमध्ये काही कारणांनी दुरावा निर्माण झाला.
हा दुरावा आता एवढ्या टोकाला गेला की, श्री बच्छाव यांनी मंत्री भुसे यांना अपक्ष उमेदवारी करून थेट आव्हान दिले आहे. हे आव्हान मंत्री भुसे यांच्यासाठी गंभीर आहे. त्याची दोन कारणे आहेत.
एक म्हणजे भुसे यांचे सर्व डावपेच बच्छाव यांना चांगलेच ठाऊक आहेत. दुसरे कारण म्हणजे बच्छाव आणि भुसे यांचे समर्थक आणि मतदार दोन्हीही मालेगावच्या शहरी भागाशी निगडित आहेत. त्यामुळे शहरी भागातील मतांसाठी या दोघांमध्ये अतिशय चुरशीची लढत होईल.
याउलट शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांचा ग्रामीण भागातील मतदारांवर वरचष्मा आहे. शैक्षणिक संस्थांच्या आणि अन्य कामकाजातून हिरे यांचा मालेगावच्या प्रत्येक गावात संबंध आहेत. त्यामुळे त्यांची एक यंत्रणा मालेगाव मतदार संघात सक्षमपणे कार्यरत करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये गेले वर्षभर भुसे यांनी सत्तेच्या माध्यमातून अद्वय हिरे यांच्या विरोधात पोलीस आणि विविध न्यायालयीन खटल्यांचा ससेमिरा लावला होता. त्यामुळे भुसे आणि हिरे समर्थकांत टोकाचा संघर्ष आहे. यामध्ये बंडू काका बच्छाव यांनी मालेगावच्या शहरी भागातील मतांना शेज लावल्यास मंत्री भुसे यांना ते त्रासदायक ठरू शकते.
त्यामुळेच गेली वीस वर्ष जिवलग मित्र असलेल्या बच्छाव यांनीच भुसे यांना आव्हान देत उमेदवारी केली आहे. बच्छाव यांचा हा निर्णय भुसे यांच्या अडचणीत वाढ करणारा आहे, हे सांगण्यासाठी राजकीय तज्ञांची गरज नाही.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.