Nagar News: श्रीगोंद्यातील नागवडे पती-पत्नीने काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अवघ्या काही तासात काँग्रेस ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसला जिल्हाध्यक्ष दिला आहे. जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती जिल्हाध्यक्षपदावर केली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांचा सात फेब्रुवारीला वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करीत असतानाच श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे आणि त्यांची पत्नी अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर आमदार थोरात चांगलेच अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आणि काही तासाच काँग्रेसला जिल्हाध्यक्ष दिला. जयंत वाघ यांनी जिल्हाध्यक्षपद स्वीकारताच 'झोकून देऊन काम करणार', असे सांगितले आहे.
संगमनेर येथील थोरात साखर कारखाना अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात जयंत वाघ यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आलेले नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
आमदार थोरात म्हणाले, "काळ संघर्षाचा आहे. मात्र भविष्य काँग्रेस पक्षाचे आहे. झोकून देऊन काम करा. आपण जिल्ह्यात काँग्रेस बळकटीने उभी करू. जिल्ह्यात काँग्रेस नक्की सक्षमपणे काम करेल". जयंत वाघ यांनी आजवर कायम कामाला प्राधान्य दिले. कोणत्याही पदाच्या अपेक्षेत ते अडकले नाही किंवा कधी कोणत्या पदासाठी त्यांनी आग्रह धरला नाही. आज या संघर्षाच्या काळात त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, असाही विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण काळे यांनी या कठीण काळामध्ये काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकत्रितपणे जिल्ह्यात काम करेल. एकजुटीने पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू, असे म्हटले. ज्ञानदेव वाफारे, प्रताप शेळके, संपत म्हस्के, सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल, विश्वास मुर्तडक उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.