

Radhakrishna Vikhe Patil news : संगमनेर तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
“उद्भव नसताना योजना पूर्ण केल्या म्हणता, मग लोकांनी हवा प्यायची का? नागरिकांना पाणी कोण देणार? आधी किती योजना प्रत्यक्ष सुरू आहेत ते सांगा,” अशा कठोर शब्दांत त्यांनी संबंधित अधिकारी, ग्रामसेवक आणि यंत्रणेला फैलावर घेतले.
संगमनेर (Sangamner) इथं झालेल्या टंचाई आढावा बैठकीला आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “संगमनेर तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशनची कामे सुरू असताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी का केली नाही? तुम्ही कधी अंभोरे गावात जाऊन परिस्थिती पाहिली आहे का?” असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत, त्या गावांचे वेळापत्रक तयार करून ग्रामसेवक आणि तलाठ्यांना देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
“पुढचे दोन-तीन महिने अत्यंत जबाबदारीने काम करा. विजेच्या अडचणींमुळे पाणीटंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. कामात कुचराई झाली तर कोणालाही माफी नाही,” असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. माझ्या बोलण्याचे वाईट वाटले तरी चालेल, पण नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नात हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या गावांमध्ये ग्रामसेवक आणि तलाठी यांची उपस्थिती बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. टंचाईच्या काळात नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणी मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करत, काही अधिकारी आणि कर्मचारी परिस्थिती गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनुपस्थित राहणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्याचे आदेशही त्यांनी वरिष्ठांना दिले.
बैठकीत घुलेवाडी येथील नागरिकांनी जलजीवन योजनेच्या कामांबाबत तीव्र संताप व्यक्त केला. “पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नाही. नागरिकांचे हाल होत आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, “त्या ठेकेदाराला तुम्ही दत्तक घेतले आहे का? त्याचे नाव घ्यायलाही लाज वाटते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार,” असे म्हणत त्यांनी संबंधित महिला अधिकाऱ्यांनाही सुनावले.
वनकुटे गावासाठी टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवून जवळपास महिना उलटला, तरी प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी बैठकीत मांडली. गावातील महिलांना आणि नागरिकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे ग्रामस्थ पोपट हांडे यांनी सांगितले. जलजीवन मिशनचे कामही अद्याप अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.