Mumbai News : शरद पवार यांचे झोंबलेल्या एका वाक्यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पवार-विखे यांच्या राजकीय घामासानमध्ये पवारांचा शिलेदार खासदार नीलेश लंकेंनी उडी घेतली.
शरद पवारांवर मंत्री विखे यांनी टीका करताच, खासदार नीलेश लंके यांनी 'ट्विट' करत मंत्री विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिलेंचे नाव न घेता, नगर जिल्हा बँकेतील काही गोष्टींबरोबर सहकारातील उद्योगांची आठवण करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी मुळा प्रवरा बुडविणारे, गणेश कारखाना संपविणारे, तनपुरे कारखान्याचे हाल करणारे आणि नगर जिल्हा बँकेचे वाटोळे करणारे सहकारी वाचवायला निघालेत म्हणे? असा प्रश्न करत मंत्री राधाकृष्ण विखे आणि नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता हे महाशय आदरणीय पवार साहेबांवर बोलतात, तेंव्हा त्यांच्या कोडगेपणाचे कौतुक वाटते, असा टोला लगावला आहे.
खासदार नीलेश लंके या टोलेबाजीवर न थांबता, पुढे जिल्हा सहकारी बँकेतील घोटाळ्यांची देखील आठवण करून दिली आहे. महोदय, जिल्हा बँकेतील भरती घोटाळा, संगणक घोटाळा, नोकर भरती घोटाळा जनता विसरलेली नाही!, याची आठवण नीलेश लंके यांनी करून दिली आहे.
मुंबईतील कार्यक्रमात शरद पवार यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेविषयी चिंता व्यक्त केली होती. काँग्रेसचे (Congress) नेते आमदार बाळासाहेब थोरात देखील या कार्यक्रमात सहभागी होते. शरद पवार यांनी कोणाचेही नाव न घेता जिल्हा बँक आणि नगर जिल्ह्यातील सहकाराविषयी चिंता व्यक्त केली होती. "बाळासाहेब, मला नगर जिल्हा सहकारी बँकेची आता काळजी वाटायला लागलीय.आज तिथं कशी आणि कोणती लोकं बसलीत, त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथं काय शिजतंय ते सगळ्यांना माहिती आहे", अशी शब्दात शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील सहकाराविषयी चिंता व्यक्त केली होती.
भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांच्या चिंतेवर जशास-तसे प्रत्युत्तर दिले. "नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची शरद पवार यांनी चिंता करू नये. नगर जिल्ह्यातील सहकारी संस्था चालवण्यासाठी जिल्ह्यातील नेतृत्व समर्थ आहे. राज्यातील सहकार क्षेत्र शरद पवारांनी स्वतः आपल्याच भोवती ठेवले होते. राज्यातील सहकार क्षेत्रातील वर्चस्व संपुष्टात आल्याची खंत त्यांना असावी", असे प्रत्युत्तर दिले होते.
शरद पवार आणि मंत्री विखे यांच्या या टीका-टिप्पणीत पवारांचा शिलेदार खासदार नीलेश लंके यांनी उडी घेतली आहे. शरद पवार यांच्यासाठी कायपण, म्हणणारे खासदार लंके यांनी खोचक ट्विट केले आहे. यात झोंबणारे प्रतिक्रिया असल्याने, त्याचे आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद उमटतील, असे दिसते. मंत्री राधाकृष्ण विखे जोरदार प्रत्युत्तर देत असताना नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी संयम दाखवत मौन बाळगून आहे. माजी आमदार कर्डिले यांचे हे मौन विरोधकांना सूचक आहे, असे देखील बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.