Ahmednagar News : भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या गावभेट जनसंवाद पदयात्रा सांगता सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
राम शिंदेंनी केलेला प्रत्येक शाब्दिक वार पवारांच्या जिव्हारी लागेल, असाच होता.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी, राम शिंदेंनी नेमलेल्या इव्हेंट आणि पोशाखावर भाष्य करत टीका केली होती. राम शिंदेंनी याचा चांगलाच समाचार घेतला. 'मी कधीच नाकारले नाही की, मी केस काळे करतो. तुझे आई-वडील नाही का करीत? ते पण जाहीर कर. आणि तुला सहन होत नसेल, तर तू पण काळे कर. मी कपडे चांगले घालतो, याला नीट दिसत नाही, यात माझा काय दोष. तू बर्म्युडा घाल, मी काहीच म्हणणार नाही', असा प्रा. राम शिंदेंनी टोला लगवताच सभेच एकच हशा झाला.
प्रा. राम शिंदे (BJP) म्हणाले, "मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष मंत्रिपदाच्या कार्यकाळात भरून काढला. मात्र काम करून पडलो, याचे शल्य मनाला बोचले. लोकांवर खापर फोडण्यापेक्षा स्वता:चे आत्मपरीक्षण केले आणि आपला संवाद सर्वसामान्य मतदारांशी कमी पडला या निष्कर्षावर पोचलो. हा संवाद करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा सुरू केली. समोरचा विरोधक आला तो नवखा होता. मोठ्या घराचा होता. भुलवा-भुलवी घडली आणि मतदारसंघ त्याला भाळला. आपल्याला काम जमले. त्याला नौटंकी चांगली जमते". आगामी काळात लाडकी बहीणच महायुतीच सरकार घडवणार, असा विश्वास आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
भाजपचे आमदार शिंदेंनी रोहित पवारांना संपूर्ण भाषणात चांगलेच लक्ष्य केलं. त्यांच्या मनमानी आणि 'हम करे सो कायदा', कार्यपध्दतीवर टीकास्त्र सोडले. 'आम्ही कामे आणली आणि हा त्याच्यासमोर स्वत:चे फलक लावत श्रेय घेतो. किमान जनाची नाही, तर मनाची, तरी लाज वाटली पाहिजे. ये समोर आणि सांग तुझ्या कार्यकाळात काय कामे केली? देतो तुला उघड आव्हान. अरे शब्द देतो. तो पुरा करतो हीच राम शिंदेंची ओळख आहे. मी डांबरी रस्त्याचे जाळे निर्माण केले. यांनी केलेली पादणं रस्ते दुसऱ्याच पावसात वाहून गेले. हा तुमचा विकास. तुम्ही म्हणता मी पडलेलो आमदार आहे. मी ते नाकारत नाही. पण मी कामदार आहे, हे तुम्ही नाकारू नका. विजयी होऊन घरी आले. मोठ्या मनाने सत्कार केला. जिगरबाज माणूसच सत्कार करू शकतो. त्याला देखील सुसंस्कृतपणा लागतो', असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.
'देवदर्शनसाठी गाडी, मुलांना आमिष, चार वर्षे तुला कोणी दिसलं नाही का? जमीन मारली, उपोषण करावे लागले. जमीन तर गेली पाचव्या दिवशी उपोषण सोडले. नाहीतर बिचाऱ्या त्या अन्याय झालेल्या शेतकऱ्यांची विकेट पडली असती. लाडकी बहीण योजनेचा दुतोंडी मांडूळ एकीकडे कोर्टात आणि अधिवेशनात विरोध करतो. दुसरीकडे स्वताःचे फोटो लावून चुकीचे फॉर्म भरतो. तुझा विकास फक्त सोशल मीडियावरच, पण प्रत्यक्षात काहीच नाही. पडलेला असताना प्रत्येक गावात मोठा निधी खेचून आणला. अरे भाग्य लागतं विधान परिषदेवर जायला, असे म्हणत आपला तो आपणच असतो, म्हणत साथ द्या', अशी भावनिक साद प्रा. राम शिंदेंनी यावेळी घातली.
न्हावरा-वालवड-जामखेड, अमरापूर-भिगवण, नगर-सोलापूर हायवे आपल्या आणि खासदार सुजय विखे यांच्या कार्यकाळात मंजुरी असून तो रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. आणि हा पठ्या दिल्लीत जातो. एक कागदाचा तुकडा घेतो. आणि त्यांचे फोटो काढत आपणच मंजूर करून आणला, असे व्हायरल करतो. अरे बाबा, सरकार आमचं. निधी आमचा. लोकप्रतिनिधी आम्ही. असले धंदे बंद करा, खरं खोटं करायचं असेल, तर आणतोच गडकरीसाहेबांना, तेच सांगतील, रस्ता कोणी आणला, असे म्हणत आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांना आव्हान दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.