

Shrirampur Politics : राजकारणात कधी विरोधक, तर कधी सहकारी; पण मैत्रीच्या बाबतीत कायम एकदिलाने राहिलेले (कै.) जयंतराव ससाणे आणि (कै.)अनिल कांबळे ऊर्फ बाबासाहेब म्हणजे श्रीरामपूरची ‘जय-वीरू’ जोडीच! निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले, तरी मैत्रीचा धागा कधी तुटला नाही.
या दोघांच्या मैत्रीचे किस्से सांगताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरच्या राजकारणावरही, अशी काही फटकेबाजी केली की, तैलचित्र अनावरणाचा गंभीर सोहळा हास्यविनोदाने रंगून गेला. पालिकेच्या सभागृहात माजी नगराध्यक्ष (कै.) अनिल शामराव कांबळे उर्फ बाबासाहेब यांच्या तैलचित्राचे अनावरण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार हेमंत ओगले होते.
मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "बाबासाहेब, जयंतराव आणि मी अनेकदा वेगवेगळ्या राजकीय भूमिकांत राहिलो. आमच्यात वादही झाले; पण मैत्री कायम राहिली. कधी काही बिनसले, तर एकमेकांना समजावून ‘तुम्ही भांडू नका’ असे सांगावे लागायचे. शिवराळ; पण आपुलकीच्या भाषेत मित्रांशी संवाद साधणे, ही बाबासाहेबांची खासियत होती."
श्रीरामपूरच्या (Shrirampur) बदलत्या राजकीय समीकरणांवर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी आणखी एक टोला लगावला. येथे आज एक कार्यकर्ता एका गटात असतो, तर उद्या दुसऱ्या गटात दिसतो. श्रीरामपूरमध्ये नेमके काय चालले आहे, हे अनेकदा समजत नाही. कोणते वासरू कोणत्या गाईला पिते, हेच कळत नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. जयंतरावांसोबत वर्षानुवर्षे काम करूनही येथील राजकारणाचा अंदाज येत नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.
बाबासाहेबांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची आठवण सांगताना मंत्री विखे पाटील म्हणाले, त्यांची उंची आणि शरीरयष्टी पाहता ते विधानसभेत आले तर आमदारच वाटायचे. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या व्यायामाच्या आवडीचा उल्लेख करीत त्यांनी आमदार हेमंत ओगले यांनाही त्यांच्याकडून व्यायामाचे धडे घेण्याचा सल्ला दिला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी प्रास्ताविकात तैलचित्र परंपरेचा इतिहास सांगितला. नगराध्यक्षांच्या कार्याची आठवण जपण्यासाठी बाबासाहेबांनी 1992 मध्ये तैलचित्रे लावण्याची परंपरा सुरू केली. ‘युथ पॉवर’च्या माध्यमातून तरुणांची फळी उभी केली. राम-रहीम उत्सव सुरू करण्याबरोबरच जिजामाता चौकातील शॉपिंग सेंटर आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिले. शेवटच्या काळात पत्नी भारतीताईंनी त्यांची लहान मुलाप्रमाणे काळजी घेतल्याची भावूक आठवणही गुजर यांनी सांगितली.
अध्यक्षीय भाषणात आमदार हेमंत ओगले यांनी (कै.) जयंतराव आणि बाबासाहेब यांची तैलचित्रे एकापाठोपाठ सभागृहात लागल्याचा आनंद व्यक्त केला. पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे श्रीरामपूरचा पाणीप्रश्न मार्गी लागत असल्याचे सांगत वैजापूर परिसरातील बंधारे भरण्याची मागणी केली. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राजकीय विरोध असूनही बाबासाहेबांशी मैत्री कायम राहिल्याचे सांगितले. भारतीताई कांबळे यांनी भावूक होत नगराध्यक्ष करण ससाणे आणि सहकाऱ्यांनी हा सोहळा सुंदर केल्याबद्दल आभार मानले. त्यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, ज्येष्ठ नेते जलीलभाई पठाण, माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपनगराध्यक्षा कांचन सानप , संजय छल्लारे, मुजफ्फर शेख, कांबळे परिवार आणि नागरिक उपस्थित होते.
स्वागतपर मनोगतात नगराध्यक्ष करण ससाणे यांनी (कै.) जयंतराव ससाणे आणि बाबासाहेब यांनी श्रीरामपूरचा सामाजिक सलोखा व मैत्रीची परंपरा जपल्याचे सांगितले. राजकीय मतभेद असतानाही बाबासाहेबांनी दिलेल्या सहकार्याची आठवण त्यांनी सांगितली. श्रीरामपूर शहराच्या विकासातील बाबासाहेबांचे योगदान कायम स्मरणात राहावे, यासाठी श्रीरामपूरच्या साठवण तलावाला अनिल कांबळे, असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. या घोषणेला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.