धुळे : साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) दणदणीत विजय मिळविला. त्यासाठी विरोधकांच्या उणीवा त्यांनी अचुक हेरल्या. निवडणुकीतील विजयासाठी वरिष्ठ नेत्यांची रसद आणि गल्लोगल्ली लक्ष्मीदर्शनाची जोड दिल्याने साक्रीत (Dhule) सत्ता परिवर्तन घडल्याची चर्चा होऊ लागली आहे. ती खरी का खोटी हे विजयी नगरसेवकांच्या कार्यकर्तृत्वातून पुढे स्पष्ट होणार आहे. (BJP Wins Nagarpanchayat Election in Sakri,Dhule)
साक्री शहरात ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंत गेल्या चाळीस वर्षांपासून अबाधित सत्ता गाजविणारे नेते ज्ञानेश्वर नागरे विरुद्ध भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात ही वर्चस्वाची लढाई झाली. धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडसाद साक्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमटले. श्री. नागरे यांना कायम साथ देणारे नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचाही या निवडणुकीतून पाडाव करण्याचे ध्येय भाजप नेत्यांपुढे होते. त्यात हा पक्ष यशस्वी झाला. त्यासाठी साम- दाम- दंड- भेद याप्रमाणे साक्रीत कधी नव्हे तो लक्ष्मीदर्शनाचा भरीव योग भाजपमुळे घडून आल्याचे बोलले जाते.
नागरे यांच्यावर नाराजी
कोरोना काळात नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांचे शहराकडे दुर्लक्ष, कॉलनी परिसरातील मागण्यांऐवजी रस्त्यावर भर, दोन निवडणुका पाणीप्रश्नावर लढूनही निराकरण नाही, श्री. नागरे यांना विचारल्याशिवाय अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्यावर बंधने यासह विविध चर्चेतील उणिवा भाजपने हेरल्या. शहरातील कॉलनी व वंचित घटकांचे भागही श्री. नागरे यांच्यावर नाराज होते. त्यामुळे नाराज मतदारांना आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आले. त्यास धुळे महापालिकेच्या निवडणुकीतील लक्ष्मीदर्शनाच्या भाजप पॅटर्नची जोड दिल्यानेही साक्रीत प्रथमच सत्ता परिवर्तन घडून आल्याचे मानले जाते. या स्थितीमुळे श्री. नागरे गटालाही धनशक्तीचे प्रदर्शन करण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. परिणामी, साक्रीत प्रथमच पैशांचा महापूर पहायला मिळाला असे बोलले जाते.
पाच वर्षे सर्वांचे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही, तर काँग्रेसला मुस्लीमबहुल भागातील एक जागा मिळाली आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्याने विरोधी पक्ष नेते पद श्री. नागरे गटाकडे आले आहे. साक्रीतील विविध राजकीय घडामोडींमुळे पुढील पाच वर्षे नगरपंचायतीच्या कारभाराकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यात साक्री शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असू, अशी ग्वाही भाजपचे जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रभारींसह पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोनवणेंचा राजीनामा
भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेसने स्वबळाचा नारा देत भाजपला छुप्या मदतीची भूमिका पार पाडल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे साक्री शहराध्यक्ष सचिन सोनवणे व गटाने आपल्याच पक्षाच्या भूमिकेवर बहिष्कार टाकत महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. तसेच अशा राजकारणाला विरोध करत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून श्री. सोनवणे यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.