महापौरांच्या `भैय्या`च्या आशीर्वादाने भाजपचे दोन नगरसेवक कचऱ्याचा ठेका चालवितात`

कचऱ्याप्रश्‍नी महानगरप्रमुख मोरे यांचे धुळे महापौर कर्पे यांच्यावर टीकास्त्र
Mayor Pradeep Karpe & Shivsena leader Manoj More
Mayor Pradeep Karpe & Shivsena leader Manoj MoreSarkarnama

धुळे : दिवाळीत महापालिकेच्या गैर व नियोजनशून्य कारभारामुळे धुळे शहरातील कचरा संकलन व घंटागाडीची सेवा ठेकेदार वॉटरग्रेस कंपनीने बंद केली आहे. वास्तविक, ऐन दिवाळीत ठेकेदाराने जनहित समोर ठेवणे गरजेचे होते. मात्र, याप्रश्‍नी सत्ताधारी भाजपचे महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांनी वॉटरग्रेस कंपनीला शिवसेना व महानगरप्रमुख मनोज मोरे (Manoj More) यांनी काम बंद करायला सांगितले व त्यातून भाजपच्या बदनामीचे कटकारस्थान केल्याचा निराधार आरोप वैफल्यातून केल्याचे श्री. मोरे यांनी पलटवार करताना पत्रकात म्हटले आहे.

Mayor Pradeep Karpe & Shivsena leader Manoj More
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाथाभाऊ खडसेंपुढे कच्चा लिंबू ठरले?

शहरातील खड्डेयुक्त रस्ते, त्यासाठी प्राप्त २४ कोटींचा निधी आणि कचरा संकलनप्रश्‍नी भाजप व शिवसेनेत जुंपली आहे. त्यातून गेल्या दोन आठवड्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महापौर कर्पे यांच्या भूमिकेचा समाचार घेताना श्री. मोरे यांनी म्हटले आहे, की महापालिका निवडणुकीत पात्रता दाखवायची नसते, ती सिद्ध करायची असते. पात्रता नसतानाही श्री. कर्पे महापौर झाले आहेत. आपल्या भय्याच्या आशीर्वादाने भाजपचे दोन दबंग नगरसेवक कचऱ्याचा ठेका चालवितात. ते माहिती असूनही महापौर बोलणार नाहीत. कारण त्यांच्यापुढे महापौर बिचकतात.

Mayor Pradeep Karpe & Shivsena leader Manoj More
नीलेश लंके म्हणाले, `युवक राजकारणात आले तरच राजकारणाची सुधारणा`

शहरात कचरा संकलनाचे काम बंद करून भाजपला बदनाम करण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा महापौर कर्पे यांचा आरोप निराधार आहे. असे कृत्य भाजपच करू शकते. मुळातच शहरात भाजप बदनाम आहे. जनहिताचे कुठलेही प्रश्‍न, धड रस्ते, पाणीप्रश्‍न सत्ताधारी भाजप सोडवू शकलेला नाही. त्यात शिवसेनेचा विरोधकांना बदनाम करून पुढे येणे हा मूळ उद्देश नाही. शिवसेनेचा लढाऊ बाणा असून, तो जनतेसाठी असतो. त्यात शिवसेनेच्या खड्डे, नादुरुस्त रस्तेप्रश्‍नी ‘बाप दाखव नाही, तर श्राद्ध घाल’ या पद्धतीच्या निर्णायक आंदोलनामुळे भाजपसह महापौर अस्वस्थ झाले आहेत.

कचऱ्याप्रश्‍नी ठेकेदार वॉटरग्रेस कंपनीत मी भाजपमध्ये असतानाच चार ते पाच महिन्यांचा भागीदार होतो. त्यात भय्याला दिलेले २५ लाख रुपये व वॉटरग्रेस कंपनीत टाकलेले लाखो रुपयांचे भांडवल, असे नुकसान मी सोसले आहे. मात्र, भय्याने वॉटरग्रेससोबत गुप्त करार करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भाजपच्या दोन दबंग नगरसेवकांना वॉटरग्रेसचा कारभार सोपविला, हे महापौरांसह धुळेकरांना माहिती आहे. त्या दबंग नगरसेवकांना चांगले काम करा, हे सांगायचे धाडस भाजपसह महापौरांमध्ये नाही. घंटागाड्या खराब झाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. मात्र, घंटागाड्यांमध्ये बायोडिझेल कोणत्या भय्याचे टाकले जात होते त्याची माहिती महापौरांनी घ्यावी.

महापालिकेतील सर्वच ठेके भाजपच्याच कार्यकर्त्यांकडे आहेत. त्यांनी शौचालयाच्या कामातही चिरीमिरी सोडली नाही. हा सर्व खेळ भय्याच्या संमतीने चालतो. त्यामुळे यावर निर्बंध घालण्याचे बळ महापौरांच्या अंगी नाही. त्यामुळे ते शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. मी एकदाच स्वीकृत नगरसेवक झालो आहे, अशी अपूर्ण माहिती महापौरांना आहे. जनतेतून मीही एकदा निवडून आलो आहे. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. महापौर सलग पाच वेळा निवडून आले, तरी त्यांना शरद वराडे यांनी चारीमुंड्या चीत केले होते. भाजपमध्ये सत्तेचे पद मिळविण्यासाठी पात्रता हा निकष असता तर शीतल नवले, वालीबेन मांडोरे, प्रतिभाताई चौधरी, संजय पाटील किंवा व्यापारी हर्ष रेलन यापैकी एखादा महापौर झाला असता, पण ही स्वाभिमानी मंडळी असल्याने, त्यांनी गैरकारभाराला खतपाणी घातले नसते. त्यामुळे कुणाची काय पात्रता हे सांगण्याची शिवसेनेला गरज नाही, असेही श्री. मोरे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com