नाशिक : केंद्रीय मंत्र्यांचा (Centre Government) काही प्रोटोकॅाल असतो. प्रशासनाने याविषयीचा प्रोटोकॅाल गांभिर्याने घेतला पाहिजे होता. मात्र महापालिकेचे (NMC) अधिकारी ते विसरले. हे योग्य नाही. त्यांनी प्रोटोकॅाल लक्षात ठेवायलाच पाहिजे होता, या शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपला संताप व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने काल आयटी पार्कचा प्रस्तावासाठी कार्यक्रम घेतला होता. हॉटेल गेटवेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आयटी कॉनक्लेव्ह-२०२२’ चे उद्घाटन श्री. राणे यांच्या हस्ते झाले. मात्र त्याला महापालिकेतील सत्ताधारी भाजप वगळता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. खुद्द महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी देखील या कार्यक्रमाची दखल घेतली नाही. ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. त्यामुळे किमान आपल्या स्वागताला तरी महापालिका आयुक्तांनी यायला पाहजे होते, अशी विचारणा श्री. राणे यांनी केली. ते चांगलेच संतापले. त्यांचा हा संताप कार्यक्रमातील भाषण, भाजपचे पदाधिकारी यांच्याकडेही त्यांनी व्यक्त केला.
प्रशासनावर राजकीय दबाव
आयटी पार्क वरून सत्ताधारी व प्रशासन, असा सुप्त वाद आहे. त्याला अनुसरून श्री. राणे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्यावर निशाणा साधताना प्रशासन राज्य शासनाच्या दबावाखाली काम करत असल्याचा थेट आरोप केला. केंद्रीय मंत्री असल्याने आयुक्तांनी प्रोटोकॉलनुसार उपस्थित राहणे आवश्यक होते. कैलास जाधव यांनी प्रांताधिकारी म्हणून हाताखाली काम केले आहे. त्यामुळे त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. शिवसेना हा पक्ष विकासाला विरोध करणारा आहे. शेतकरी, पायाभूत सुविधांवर राज्यात एकही काम झाले नाही. याउलट केरळ, तमिळनाडू, उत्तर प्रदेश ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा पुढे गेली आहेत. सुक्ष्म उद्योगांसाठी ५० लाख, लघु उद्योगांसाठी ५० कोटी, तर मध्यम उद्योगांसाठी अडीचशे कोटी रुपये केंद्र सरकारकडून मदत मिळत असल्याने राज्य शासनाला पत्र देवूनही अद्याप त्यावर उत्तर न दिल्याने राज्य सरकारची निष्क्रियता यातून समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी झालेल्या या कार्यक्रमात श्री. राणे म्हणाले, सर्वांगांनी सुंदर असलेल्या नाशिक शहरात आयटी कंपन्यांची आवश्यकता आहे. आयटी पार्कच्या माध्यमातून शहरात विकासाच्या दृष्टीने मोठे परिवर्तन घडेल. विकास हाच माझा धर्म असल्याने प्रत्येकाला माझ्याकडे येणाया प्रत्येकाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने खासगीकरणाच्या माध्यमातून साडेतीनशे एकर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव तातडीने केंद्र सरकारकडे सादर करावा. प्रस्तावाला मान्यता मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतो. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेदेखील पुढाकार घेईन, असे ठोस आश्वासन केंद्रीय मंत्री राणे यांनी दिले.
भाजपचे प्रभारी आमदार जयकुमार रावल यांनी भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या कामांचा उल्लेख करताना नाशिकला विकासाबाबत भवितव्य असल्याचे सांगितले. एनटीटी ग्लोबरचे चेतन सोनार, ईएसडीएसचे पियुष सोमानी, नीता संस्थेचे अध्यक्ष अरविंद महापात्रा, ऋषिकेश वाकदकर, प्रदीप पेशकार हितेन शहा, विवेक जायखेडकर यांनी आयटी पार्कची गरज अधोरेखित केली. महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक हर्षल बाविस्कर यांनी ग्रीन झोनमध्ये आयटी पार्क झाल्यास अतिरिक्त एफएसआय देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे स्पष्टीकरण दिले, तर आडगाव येथील महापालिकेच्या पंधरा एकर जागेत प्रस्तावित आयटी पार्कमध्ये महापालिकेकडून सुविधा पुरविल्या जाणार असल्याचे सांगितले.
उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, हिमगौरी आहेर-आडके, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, अरुण पवार आदी उपस्थित होते.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.