डॉ. राहुल रनाळकर
नाशिक : शहरांमध्ये (Nashik) वाचनालये ओस पडत असल्याचं चित्र आहे. शहरी वाचनालयांच्या (Library) आपल्या स्वतंत्र समस्या आहेत. या समस्यांचा आणि वाचकांचा तसा थेट संबंध येत नाही. अशा स्थितीत शहरापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव (Chachadgaon) येथे ग्रामपंचायतीच्या छोट्याशा खोलीत एका वाचनालयाचा मोठा उत्सव (Celebrations) साजरा होतो. हे अप्रुप सध्या चर्चेचा विषय आहे.
नाशिकमधील आदिवासी बांधवांसाठी कार्यरत असलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी हे वाचनालय सुरू झालंय. एखाद्या गावात वाचनालय सुरू होणं ही तशी एक सामान्य बाब. पण वाचनालयाचा प्रारंभ होताना संपूर्ण गावानं उत्सव साजरा करणं, अत्यानंदित होणं, नाचणं, ग्रंथ दिंडी काढणं, गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार न राहणं ही गोष्ट सामान्य नक्कीच नाही.
वाचनालय आणि ग्रंथांच्या स्वागतासाठी चाचडगाव गेल्या कित्येक वर्षांपासून जणू आसुसलेलं होतं. पाण्यावाचून, रस्त्यावाचून, विजेवाचून आसुसलेली गावे आपण पाहिली आहेत, अशा गावांबद्दल वाचलं-ऐकलं आहे. पण चाचडगाव हे पुस्तकांच्या भेटीसाठी तळमळत होतं, ही बाब या गावाला भेट दिल्यानंतर चटकन जाणवली. इथल्या गावकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पुस्तकांबद्दलची चमक दिसून येत होती. अनेक वाचनालये निर्माण होतात, ती लुप्तही होतात. पण इथे इतक्या आश्वासक पद्धतीनं वाचलनायचं स्वागत झालं, ते केवळ शब्दातीत. गावातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थी नवे पोशाख परिधान करून पुस्तकांच्या स्वागतासाठी सज्ज होते. लहानग्या मुलींनी डोक्यावर मंगल कलश घेऊन ग्रंथांचं स्वागत केले. गावातील वडिलधाऱ्या मंडळींनी ग्रंथांचं पूजन केलं आणि ग्रंथदिंडी काढली. माध्यमिक शाळेच्या मुलींनी लेझीम खेळत पुस्तकांचं आगमन साजरं केलं. एवढी जाणीव या छोट्याशा गावातील मंडळींमध्ये कुठून निर्माण झाली असावी, हे शोधण्यासाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागेल.
वाचनसंस्कृती आणि वाचन संस्कार रुजविण्यासाठी काही मंडळी जरूर प्रयत्न करताना दिसतात. सध्याच्या माहितीच्या युगात माहितीचा मारा अत्यंत वेगानं सगळ्या समाजावर आदळताना दिसून येतो. पण डोक्यात येऊन पडणाऱ्या माहितीचा कचरा आणि ज्ञान यांत मूलभूत फरक आहे. हा फरक समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष वाचन, चिंतन, मनन, लेखन करावं लागेल. ग्रामीण भागातील सुज्ञांनी ही गोष्ट वेळीच ओळखली आहे, हे चाचडगावमध्ये प्रामुख्यानं दिसून आलं. आजच्या पिढीला ज्ञानाची भूक आहे, पण ती कशी शमवावी, याचं अचूक मार्गदर्शन करणारी मंडळी आता फारशी उरलेली नाहीत. क्षणिक आणि वेगवान यशासाठी ही पिढी आतुर आहे. ज्ञान मिळविण्याची पारंपरिक माध्यमे त्यांना नकोशी झाली आहेत. पारंपरिक माध्यमे मग त्यात पुस्तके, वर्तमानपत्रे यांची आवड या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. चाचडगावमधील सुज्ञ, सज्जन लोकांनी हे आव्हान स्वीकारलंय, ही कौतुकास्पद बाब आहे. शहरातील मंडळी ही गरज कधी ओळखणार, हा प्रश्न आहे.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह विज्ञानाच्या जगात मौलिक कार्य केलेल्या शास्त्रज्ञांच्या जीवनावर आधारित पुस्तके चाचडगावच्या छोटेखानी ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्पर्धा परीक्षांची पुस्तकही इथं आहेत. या पुस्तकांबद्दल आणि थोर विचारवंतांबद्दल चाचडगावच्या शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय मार्मिक अशी भाषणं केली. या मुलांच्या भाषणांमधून समाजात विधायक बदल घडविण्यासाठी या गावातील मुलं आतुर असल्याचं जाणवलं. ही उत्कटता, आतुरता सध्या दुर्मिळ झाली आहे. स्पष्ट दिशा आणि गुणग्राहकता या गुणांचा अभाव शहरातील तरुण पिढीत दिसून येतो. शहरातली मुलं सोशल मीडिया, वेब सीरिजमध्ये अडकून पडलेली असताना ग्रामीण भागातील पिढी पारंपरिक ज्ञान साधनांकडे आकर्षित होणं, ही घटना अप्रूप निर्माण करणारी आहे.
---
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.