

Nandurbar Politics : नंदुरबार जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यावरुन आता शिवसेना-भाजपमध्ये वादाची नवी ठिणगी पडली असून शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
भाजपची मस्ती अजूनही जिरलेली नाही,असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या नेत्यांना इगो बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्याचवेळी मी केवळ नंदुरबार जिल्ह्यातील भाजप बाबत बोलत असल्याचा बचावही त्यांनी केला आहे.
सध्याच्या दुष्काळी परिस्थिती असल्याने निवडणुका लागण्याची शक्यता कमी असली, तरी कोणी अंगावर आले तर आमची स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी आहे, असा इशारा रघुवंशी यांनी दिला आहे. तसेच, वरिष्ठांचा आदेश आल्यास महायुती म्हणूनही निवडणूक लढवू, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असून अंतर्गत वाद पेटला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना पाहायला मिळत आहे. या वादाचा अंक आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही बघायला मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर तिखट प्रहार करत भाजपने आता जागेवर आले पाहिजे असा सल्ला दिला आहे. डबल इंजिनचे सरकार आता फार झाले, शिवसेनेला दुय्यम वागणूक देऊन भाजप निवडणुका जिंकू शकत नाही. हे विधान परिषदेच्या निवडणुकीतून सिद्ध झाल्याचे रघुवंशी यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. मित्रपक्षांनी हे शिकले पाहिजे आणि भाजपनेही यातून बोध घेतला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवसेनेमुळे राज्यात भाजप जिवंत झाली असे विधान केले होते. शिवसेनेने उठाव केल्यामुळेच भाजप सत्तेत आल्याचा दावा त्यांनी केला होता. याशिवाय एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता रघुवंशी यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचल्याने दोन्ही पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.