
Chhagan Bhujbal : गेल्या महायुतीच्या शिंदे सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यावेळी अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन खाते देण्यात आलं होतं. मात्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना डावलण्यात आलं. त्यांच्या ऐवजी भाजपच्या संजय सावकारे यांना मंत्रिपद देण्यात आलं.
अजित पवार व छगन भुजबळ यांच्यातील दूरावा पाहाता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं मंत्रिपद अनिल पाटील यांच्याकडे जाईल अशी शक्यता व्यक्त होत होती. मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर दौऱ्यावर असताना अनिल पाटील यांचा विचार मंत्रिपदासाठी होऊ शकतो असे संकेत दिले होते. मात्र प्रत्यक्षात भुजबळांनीच मंत्रिपदाची शपथ घेतल्याने पाटील यांची संधी हुकली आहे.
जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या 11 आमदारांपैकी एकमेव अमळनेरची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे. जिल्ह्यात भाजपचे गिरीश महाजन, संजय सावकारे, रक्षा खडसे या नेत्यांकडे मंत्रिपद आहे. तर शिंदे शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत. राष्ट्रवादीला जिल्ह्यात मंत्रिपद नसल्याने धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनिल पाटील यांना संधी दिली जाईल असे बोलले जात होते. शिवाय ती राष्ट्रवादीची हक्काची जागा होती.
खान्देशात पाचही मंत्री ओबीसी व इतर प्रवर्गाचे असून, एकही मंत्री मराठा नसल्याने मोठा सामाजिक असमतोल खान्देशात निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात अनिल पाटील यांच्या रुपाने मराठा समाजाला स्थान मिळालं होतं. मात्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मर्यादित जागांचा विचार करता अजित पवार यांना अनिल पाटील यांना संधी देता आली नव्हती. त्यामुळे आता ती संधी होती, त्यामुळे अनिल पाटील यांचा विचार केला जाऊ शकतो असे वाटत असताना मात्र पुन्हा भुजबळांनी बाजी मारली.
मंत्रिपद डावलण्यात आल्याने अनिल पाटील सुरुवातीपासूनच नाराज होते. मंत्रिपद नाही किमान एखादे महामंडळ तरी मिळेल अशी आशा असलेल्या पाटील यांना त्यासाठीही विचारलं गेलं नाही. त्यातूनच वाय प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था नाकारुन पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अमळनेर मतदारसंघात पाटील यांचा चांगला दबदबा आहे. त्यामुळे पाटील यांची नाराजी परवडणारी नाही हे बघून पक्षाने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केला,.प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी त्यांची प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदावर नियुक्ती केली. मात्र धनंजय मुंडे यांच्या जागेवर पाटील यांना मंत्रिपदाची आशा कायम होती. भुजबळांमुळे त्यांची ही संधी हुकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.