

Chhagan Bhujbal : बुधवार (दि. २८) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. यांसर्भात आता मंत्री भुजबळांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून महत्वाची अपडेट देण्यात आली आहे.
मंत्री छगन भुजबळ हे पूर्वनियोजित नियमित तपासण्यांसाठी (रूटीन चेकअप) जसलोक रुग्णालय याठिकाणी दाखल झाले आहेत. आवश्यक त्या चाचण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जसलोक रुग्णालय याठिकाणी उपचार घेणार आहेत.
छगन भुजबळ यांची प्रकृती उत्तम असून कृपया कोणीही गैरसमज पसरवू नये त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये असे आवाहन भुजबळांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान आज मुंबईत मंत्रालयामध्ये कुंभमेळा मंत्री समितीची बैठक पार पडली. कुंभमेळा मंत्री तथा समिती प्रमुख मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस मंत्री भुजबळ देखील उपस्थित होते. त्यांनी एक्स पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
या बैठकीत बोलताना, त्र्यंबकेश्वर कुशावर्तावर होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये ज्या सुविधा कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्माण होत आहेत, त्या कायमस्वरूपी नाशिकच्या जनतेला उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून नियोजन होणे आवश्यक असल्याचे सूचित केले. तसेच गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यावर देखील तातडीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त केली. सांडपाणी नदीपासून वेगळे करणे आवश्यक असल्याचे आणि त्यावर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे यावेळीही प्रशासनाला निर्देशित केल्याचे भुजबळांनी सांगितले.
तसेच सारडा सर्कल पासून द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपुल उभारणी, नाशिक कलाग्राम सुरू करणे, सिंहस्थ काळात भाविकांना जास्त पायी चालायला लागू नये यासाठी उपाय योजना, पोलिसांचे बळकटीकरण, बाहेरून येणाऱ्या पोलिसांची निवास व्यवस्था, साधूग्राम,नाशिक विमानतळ विस्तारीकरण आणि दुसरे टर्मिनल उभारणे याबाबत सूचना केल्याची माहिती भुजबळांनी दिली.
तसेच मंत्रिसमितीतील अन्य सदस्यांनी देखील नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारत बांधणे, द्वारका ते नाशिक रोड ट्राफिक बाबत उपायोजना, विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नाशिकचे ब्रँडिंग, औद्योगिक क्षेत्रात उद्योग प्रशिक्षणासाठी जागा, कुंभमेळा नियोजन तीन टप्प्यांत करणे, राज्य परिवहन महामंडळासाठी 200 नवीन बसेस, नाशिक विमानतळ परिसरात आणि इतर ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विशेष सुविधा उभारणी अशा गोष्टींची आवश्यकता व्यक्त केली. याबरोबरच सप्तशृंगी गड, तिर्थटाकेद, कपिलधारा तीर्थ, तपोवन, राम मंदिर इगतपुरी या तीर्थक्षेत्रे व पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्याची देखील मागणी मांडण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.