Nashik News : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही नेते राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेऊन एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, मंत्री छगन भुजबळांकडून आक्रमक भूमिका घेत काही विधानं केली जात आहेत, ज्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचं बोललं जात आहे.
यावरून भुजबळांवर टीका-टिप्पणीही सुरू आहे. दरम्यान, सरकारमधील त्यांचे सहकारी मंत्री राधाकृष्ण विखेंनी भुजबळांच्या राजीनाम्याबाबत विधान केलं, ज्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. त्यावर आता भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
''राजीनामा द्या, असे ते म्हणाले आहे. ते आमचे मित्र आहेत. जेव्हा पाहिजे तेव्हा राजीनामा द्यायला मी तयार आहे, पण त्यांनी त्यांच्या नेत्याकडे सांगितलं आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा एक निरोप आला तर बस संपला विषय,'' असं भुजबळ राधाकृष्ण विखेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.
''ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद सुरू झाला आहे. हा निरर्थक आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. मला वाटतं भुजबळांनी राजीनामा देऊन, मंत्रिमंडळातून बाहेर पडून बोललं पाहिजे. एकतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल काही वेगळी भूमिका घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे,'' असं विखे पाटील म्हणाले होते.
याशिवाय, ''कालपासून अनेक मेसेज मोबाईलवरून येत आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे, त्याचे फोटोही मला पाठवले जात आहेत. मी एकाला सांगितलं की, मला तर गावबंदी आहे. तर ते म्हणाले, तुम्हाला तर गावबंदी आहे; पण आमच्या पोटापाण्याचं काय?, आमचा तर सत्यानाश झाला आहे, कोण बघणार आमच्याकडे? त्यांचंही खरं आहे. त्यामुळे मी ठरवलं मतदारसंघात जोपर्यंत आपण आमदार आहोत, तोपर्यंत माझं काम आहे, की आपण गेलं पाहिजे आणि प्रत्यक्ष काय आहे ते पाहिलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांना एक धीर देण्याचं आणि त्याचबरोबर शासनाकडून अधिकाधिक मदत कशी मिळेल, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे,'' असंही भुजबळ म्हणाले आहेत.
दरम्यान,‘ गावबंदी करायला महाराष्ट्राचा सात-बारा तुमच्या नावावर आहे काय?, असा प्रश्न केल्याचे स्मरण करून देत, भुजबळसाहेब तुम्ही उद्या ज्या बांधावर येत आहात, त्याचा सात-बारा नक्कीच आमच्या नावावर आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या बांधावर येऊ नका,’ असे आवाहन बुधवारी भुजबळ यांच्या मतदारसंघातील ४६ गावांच्या प्रतिनिधींनी केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.