
Seema Hiray, Sudhakar Badgujar News : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बडतर्फ केलेले सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश सुरुवातीपासून वादाचा विषय ठरला होता. आता आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांत या वादाने नवे वळण घेतले आहे. शुभेच्छा देण्यावरून थेट पोस्टरवॉर रंगल्याने भाजप समर्थकांत दरी निर्माण झाली आहे.
नाशिकच्या सिडको परिसरात एकीकडे महापालिका निवडणुकीची चाहूल लागलेली असताना, दुसरीकडे सत्ताधारी भाजपमध्येच अंतर्गत संघर्षाचे वादळ उफाळून आले आहे. आमदार सीमा हिरे आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते सुधाकर बडगुजर यांच्यातील राजकीय वाघयुद्ध आता उघडपणे रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
त्रिमूर्ती चौकात झळकलेले दोन बॅनर सध्या सिडको परिसरात प्रचंड चर्चेचा विषय बनले आहेत. एकीकडे बडगुजर हे हात जोडून शांत, विनम्र मुद्रा स्वीकारताना दिसतात, तर दुसरीकडे आमदार सीमा हिरे अंगुलीनिर्देशन करत रोष व्यक्त करताना झळकतात. ही केवळ पोस्टरबाजी नसून, ही भाजपच्या अंतर्गत फुटीची सुरुवात आहे, असा आरोप विरोधकांकडूनही केला जात आहे.
या बॅनरमधून कोणाला इशारा दिला जातोय? बडगुजर यांना पक्षात घेतले तरी खरोखर सर्वजण त्यांचे स्वागत करत आहेत का? की त्यांच्या आगमनानेच पक्षातील जुन्या नेत्या हिरे यांच्या नेतृत्वाला सुरुंग लागतोय? हे प्रश्न आता उघडपणे विचारले जाऊ लागले आहेत.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, ही केवळ बॅनरबाजी नाही, तर भाजपच्या सत्ताकारणातील अंतर्गत संघर्षाचे दृश्य स्वरूप आहे. सीमा हिरे यांचा आक्रमक बॅनर म्हणजे 'हे क्षेत्र माझे आहे' असा संदेश आहे, तर बडगुजर यांचा हात जोडलेला बॅनर म्हणजे 'मी आलोय, पण संघर्ष नको' असा एक रणनीतिक भाव.
पक्षांतर्गत नेते, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यातही एक वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे
"हे केवळ बॅनर आहेत की पुढील बंडाची सुरुवात?"
"सत्ता टिकवण्यासाठी आपल्याच लोकांवर कुरघोडी केली जाते का?"
राजकीय मतभेदाचे हे दृश्य रस्त्यावर उतरू लागल्याने सिडको परिसरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. ही फक्त सुरुवात आहे, असे बोलले जात असून, पक्षश्रेष्ठी याकडे दुर्लक्ष करणार की कारवाई करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सिडकोत आता संघर्षाचे ढग गडद होत चालले आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येच अंतर्गत वाद टोकाला पोहोचला आहे. त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
(Edited by Ganesh Sonawane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.