
Ahilyanagar Kopargaon highway condition : अहिल्यानगरमधील मनमाड रस्ता दुरुस्तीअभावी नेहमीच चर्चेत राहिला आहे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या रस्त्यासमोर हात टेकले. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची आता, तर पुरती चाळण झाली आहे.
दुरूस्ती सुरू असली, तरी म्हणावी तेवढी गती नाही. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे आहे तसेच आहेत. यातून होणारे अपघात वेगळेच! याच रस्त्यावरील प्रवासाचा अनुभव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
अहिल्यानगर-कोपरगाव या रस्त्यावर आणि प्रवरा नदीवरच्या पुलावर मोठे खड्डे पडलेत. स्थानिक नेते या रस्त्यावरून कायम ये-जात असतात, तरी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी (ता. 17) या खड्डेमय रस्त्याचा यातनादायी प्रवासाचा अनुभव घेतला. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या सुरू असलेल्या सध्याच्या कामाला विशेषतः पुलाच्या बंद पडलेल्या कामाला गती येणार का? अशी चर्चा आहे.
गेल्या 30 वर्षांपासून आमदार असलेले शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन झाले. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटण्यात असलेल्या फडणवीसांना ही बातमी समजली अन् त्यांनी तातडीने शिर्डी (Shirdi) विमानतळ गाठले. रात्रीच्या वेळी मोटारीनं अहिल्यानगरला जाऊन कर्डिले कुटुंबियांचे सांत्वन केलं. सावळीविहीर ते अहिल्यानगर बायपास या 70 किलोमीटर खराब रस्त्यावरील प्रवासाचा येताना व जाताना अनुभव त्यांनी घेतला.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी (28 ऑक्टोबर 2021) याच मरणासन्न रस्त्यावरील पुलावरून प्रवास केला होता. त्यांच्या व फडणवीसांच्या दौऱ्यात एवढाच फरक आहे, की गडकरींचा मोटारीने प्रवास हा पूर्वनियोजित होता आणि फडणवीस यांचा प्रवास अचानक ठरला होता.
गडकरी राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यासाठी आले असताना त्यांनी शिर्डी ते राहुरी दरम्यानचा प्रवास मोटारीने केला होता. त्यावेळी रस्ते विकास प्राधिकरणाने या खुड्डे बुजवून एका दिवसापुरते जीवदान देण्याची केविलवाणी धडपड केली होती.
दक्षिण व उत्तर भारताला जोडणाऱ्या या सर्वाधिक महत्त्वाच्या रस्त्याचे गेल्या 20-25 वर्षांपासून तीन-तेरा वाजले आहेत. अनेक सरकारी आली आणि गेली, पण राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळूनही या रस्त्याची शोकांतिका कायम आहे. विशेषतः प्रवरा नदीवरील इथल्या समांतर पुलाचे रखडलेले काम सुरू करून नवीन पूल तातडीने बांधला, तरच कोल्हारमधील सातत्याने होणारी वाहतुकीची समस्या कमी होईल.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राहुरीमध्ये अनेक आंदोलन झाली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात दोनदा आंदोलन झाले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती.
सध्याच्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. पुलावर नेहमीच पडणारे खड्डे व त्याकडे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे दुर्दैवाने सामान्यांनाच सर्वाधिक आदळआपट सहन करावी लागत आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आलिशान मोटारी असतात. खड्ड्यामुळे बसणारे धक्के त्यांना जाणवत नाहीत. किंबहुना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या वेळीच खड्डे तात्पुरते बुजविले जातात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या लोणी दौऱ्यादरम्यान कोल्हार ते लोणी रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. ते खड्डे पुन्हा पडण्यास सुरुवात झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.