
Ahilyanagar News : काँग्रेसकडून वेटींगवर असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सत्यजित तांबे यांनी या भेटीचा फोटो समाज माध्यमांवर शेअर केला आहे.
यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून, ही भेट अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण आगामी काळात भूकंप घडवून आणते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्यजित तांबे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केल्याचे म्हटले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यानंतर स्मृतीत गेलेल्या अनेक राजकीय गोष्टींना उजाळा मिळू लागला आहे. सत्यजित हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेबांचा यांचा पराभव झाला आहे. भाजपचे पदाधिकारी असलेले अमोल खताळ यांना ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देत, बाळासाहेबांविरोधात उभं केलं. बाळासाहेबांना नवख्या अमोल खताळांकडून पराभवाचा धक्का बसला. बाळासाहेंबाच्या प्रचारासाठी सत्यजित तांबे देखील सक्रिय होते.
सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडून अपक्ष लढवली. तेव्हापासून ते आणि त्यांचे वडील माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे काँग्रेस (Congress) पक्षापासून लांब आहेत. या निवडणुकीपूर्वी तांबे यांचा काँग्रेसबरोबर बराच संघर्ष झाला. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडून सुधीर तांबे यांना उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिला. यातून इच्छुक असलेल्या सत्यजित तांबेंची कोंडी झाली. यानंतर पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून चुकीचा फॉर्म दिल्याचा प्रकार झाला. प्रदेश काँग्रेसच्या या चुकीवर सत्यजित यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.
तत्पूर्वी, सत्यजित तांबे यांनी अनुवाद केलेल्या पुस्तक प्रकाशनात देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरातांना, सत्यजित तांबे यांना किती दिवस बाहेर ठेवणार? अशा चांगल्या लोकांवर आमचा डोळा असतो, असं म्हंटलं होते. त्यावेळी फडणवीस आणि तांबे यांच्यातील मैत्रीवर राज्यात चर्चांना उधाण आलं होतं.
सत्यजित तांबे यांनी अपक्ष नाशिक पदवीधरची निवडणूक लढली आणि त्यात ते विजयी झाले. महाविकास आघाडीने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. सत्यजित तांबे यांनी निडवणुकीत यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले होते. अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील, हे करणे सोपे नव्हते, असे म्हणत फडणवीसांनी सत्यजित तांबे यांचे कौतुक आणि अभिनंदन केले होते. परंतु त्यावेळी सत्यजित तांबे यांनी घरण्यात काँग्रेसची विचारसरणी असल्याने ती सोडणार नसल्याचे म्हटलं.
फडणवीस आणि तांबे यांच्यामधील जवळीक आता संपूर्ण राज्याला माहित झाली आहे. सत्यजित यांनी देवेंद्र फडणवीस यांना मोठा भाऊ मानतो, असे जाहीरपणे सांगून टाकले आहे. असे असले, तरी आताची भेट अनेक राजकीय पैलुने चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनाचे निमित्त असले, तरी अनेक पदर या भेटी मागे असू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील सत्यजित तांबे यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. थोरातांचा पराभव संपूर्ण राज्याला धक्का देणारा ठरला. यात मुख्यमंत्रिपदाचं अभिनंदनानिमित्ताने सत्यजित तांबे यांची ही भेट, अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय भूकंप होतो की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.