

Congress NCP Alliance Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असताना, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या एका जुन्या दाव्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी काँग्रेसकडून मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा भुजबळांनी केला होता. या दाव्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ यांच्या दाव्याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “छगन भुजबळ हे ज्येष्ठ आणि राजकारणातील अनुभवी नेते आहेत. मला एवढंच माहिती आहे, बाकी याबाबत मला काही माहिती नाही.”
दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींनी तातडीने दिल्लीला बोलावल्याने या चर्चांना आणखी वेग आला आहे.
याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षांच्या विचारधारेबाबत मोठं विधान केलं आहे. थोरात म्हणाले, “काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा जवळपास एकसारखीच आहे. दोन्ही पक्ष राज्यघटना, संत परंपरा, बहुजन समाज आणि पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवतात. आम्ही केवळ संघटनात्मकदृष्ट्या वेगळे आहोत, विचारांच्या पातळीवर कोणताही फरक नाही.”
दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे सांगताना थोरात यांनी स्पष्ट केलं की, “विचारधारेच्या बाबतीत कोणताही मतभेद नाही. मला खात्री आहे की शरद पवार साहेब प्रतिगामी विचारधारा कधीही स्वीकारणार नाहीत.”
ते पुढे म्हणाले की, देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पुरोगामी विचारसरणी असलेल्या सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. “आज लोकशाहीसमोर गंभीर आव्हाने उभी आहेत. संविधान धोक्यात असल्याची भावना निर्माण होत आहे. अनेक स्वायत्त संस्थांवरील विश्वास कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीवादी शक्तींनी एका छताखाली येणे ही काळाची गरज आहे,” असे थोरात यांनी नमूद केले.
बाळासाहेब थोरात यांनी न्यायव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरही चिंता व्यक्त केली. “न्याय व्यवस्थेवर दबाव असल्याच्या चर्चा आहेत. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे दाद मागायची, अशी परिस्थिती तयार होत असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येणं आवश्यक ठरतं,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस हायकमांड दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांसोबत विलिनीकरणाबाबत चर्चा करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “यासंदर्भात अद्याप माझ्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. मलाही या घडामोडी माध्यमांतूनच समजत आहेत.”.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता असल्याने या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.