Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक का लढलो याचं कारण सांगितलं आहे. "मला लोकसभा निवडणूक लढवायचीच नव्हती. ही निवडणूक खेटाखेटीत झाली. मला कोणी खेटलं, तर जमत नाही, हे जगाला माहीत. विधानसभेत आनंदी होतो. पण खेटले.
आता जिंकलोय, तर न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयात काही झाले आणि पुन्हा निवडणूक झाल्यास, पुन्हा दोन ते तीन लाखांनी पराभव करेल", असा टोला खासदार लंके यांनी सुजय विखे यांना नाव न घेता टोला लगावला.
खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थित जवळे (ता. पारनेर) इथं विविध विकास कामांचे भूमिपुजन झाले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण ठोकत विरोधकांवर शरसंधान साधले. माझ्या विजयानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर निघोजमधील एकाने माझी खासदारकी जाणार, अशी पोस्ट केली. मात्र मी समोरच्याची जिरवली ना? न्यायालयात जरी काही झाले आणि निवडणूक झाली तरी पुन्हा दोन-तीन लाखांनी पराभव करत असतो, असा टोला खासदार लंके यांनी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना लगावला. मला जनतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यांना कोर्ट कचेरीसाठी वेळ दिला आहे. त्यांना पराभव मान्य नाही, असा टोला देखील लंके यांनी लगावला.
दूध भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आपण संसदेत केली. आपल्या भाषणानंतर अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी दुसऱ्या दिवशी दूध भेसळ करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईची घोषणा केली. आपल्या मागणीची दखल राज्यात घेतली गेली. तसेच डिंबे ते माणिकडोह बोगद्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. आज जरी काम झाले नाही, तरी आपले सरकार आल्यानंतर हे काम मी मार्गी लावणार आहे. कारण हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले.
पठारवाडीतील गायरान हडपण्याचा काही लोकांचा डाव आहे. त्यामागे कोण आहे? त्याला आशीर्वाद कोणाचा आहे, हे सर्वांना माहिती आहे. या प्रश्नावर पठारवाडीकरांनी एकसंघ रहावे. मी तुमच्या पाठीशी आहे. गावाच्या जमिनी कोणी बळकावत असेल, तर त्यास विरोध करणे हे आमचे काम आहे. मग बळकावणारा कोणत्याही विचारांचा असो. सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. याच प्रश्नावरून पठारवाडीच्या ग्रामस्थांना दमदाटी केली जाते. या प्रश्नावर संपूर्ण ताकद देण्याची माझी तयारी आहे. कोणी अधिकारी ऐकत नसेल, तर आपण त्यांच्या दारात जाऊन बसू. लोकांच्या नावावर जमिनी करून देण्याचा मंत्र्यांना अधिकार आहे काय? असा सवाल लंके यांनी केला.
लोकसभा निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी गेलो त्यावेळी अनामत रक्कम भरण्यासाठी माझ्या खिशात एक रूपयाही नव्हता. काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आणि शेजारी असलेल्या वकीलाने सांगितले की, सकाळीच पानोली येथील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीप्रमाणेच लोकसभेच्या निवडणुकीची अनामत रक्कम सकाळीच आणून दिली आहे. माझी निवडणूक कशी झाली हे मला कळलेही नाही. माझ्या जीवा भावाच्या सहकाऱ्यांनी सर्व यंत्रणा हातळली, हीच माझी संपत्ती आहे, माझ्या हातातील घडयाळावर टीका करणाऱ्यांना संध्याकाळचे वांधे आहे हे पहावे, असा टोला खासदार लंके यांनी लगावला.
विरोधकांनी पारनेर-नगर मतदारसंघाची काळजी करू नये. पारनेरचा विषय सोडून द्या, आपल्याला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. जिल्ह्यातून सर्व आमदार निवडून आणण्याचा शब्द शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादी पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे घटक आहेत. उमेदवारी ठरविण्यासाठी आघाडीचे नेतृत्व सक्षम आहे. त्यांचा जो निर्णय होईल त्याला आपण सहमत राहू असे खासदार लंके यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.