
Dhule corporators shouting on officers
Sarkarnama
धुळे : कोट्यवधींचे बिल मिळाले नाही म्हणून भुयारी गटार योजनेचा गुजरातमधील (Gujrat) ठेकेदार (Contractor) दिवाळीपासून पळाला आणि धुळेकरांचा जीव मात्र धोक्यात लोटला गेला त्यामुळे धुळे (Dhule)महापालिकेचा गोंधळ पुन्हा एकदा उघड झाला आहे.
अपूर्णावस्थेतील कामामुळे देवपूरमधील वर्दळीच्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गाच्या एका बाजूची पुरती वाट लागली आहे. एक ते दीड किलोमीटरपर्यंत खड्डेच खड्डे, धुळीचे लोट, हाडे खिळखिळी करणारी स्थिती कायम असल्याने त्रस्त धुळेकर ‘एमजेपी’, ठेकेदार, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) नावाने दूषणे देत आहेत.दुभाजकाच्या एका बाजूची खोदकामामुळे वाताहत झाल्याने दिवसभरात शेकडो वाहनधारक, पादचारी विरुद्ध दिशेने ये-जा करताना दिसतात.
शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची लगबग, तसेच मध्य प्रदेश, गुजरात, नंदुरबारसह जिल्ह्यातील दोंडाईचा, शिरपूरकडून येणारी वाहने, रुग्णवाहिकांचा या मार्गावरूनच वावर असतो. अशा अहोरात्र वर्दळीच्या मार्गावर दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. सव्वा लाखावर लोकसंख्येच्या देवपूरवासीयांसाठी हाच प्रमुख मार्ग दळणवळणासाठी उपलब्ध आहे. या मार्गावरील एका बाजूस भुयारी गटार योजनेच्या गुजरातमधील पटेल नामक ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याचे विविध पक्ष, संघटनांकडून वारंवार गंभीर आरोप झाले आहेत.
बोगस पद्धतीच्या चेंबर बांधकामामुळे अनेक अपघात घडले आहेत. त्याच्याशी ठेकेदार, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाला कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. वर्दळीचा जुना मुंबई-आग्रा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे या मार्गाची रोजची वाताहत रोखून एमजेपी, ठेकेदार व महापालिकेला समज देऊन नियमानुसार कालमर्यादेत रस्ता दुरुस्तीचे दर्जात्मक काम करून घेणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. तसे करारपत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), ठेकेदार, महापालिकेशी सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते की नाही याची चौकशी झाली पाहिजे.
भुयारी गटार योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली राबविली जात आहे. या यंत्रणेसह महापालिकेचा अंकुश ठेकेदारावर नसल्याने योजनेसह रस्त्यांची वाट लागली असून, यातील दोषी अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करावी, अशी मागणी देवपूरमधून होत आहे. सुशी नाल्यापुढून जीटीपी स्टॉप परिसरापर्यंत रस्त्याची वाताहत झाली असून, त्यामुळे सतत धुळीचे लोट निर्माण होत असल्याने धुळेकरांना श्वसनाचा त्रास, ॲलर्जी उफाळून सर्दी, खोकला, कफ, खड्ड्यांमुळे हाडे खिळखिळी होण्याचे आजार जडत आहेत. तसेच वाताहत झालेल्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेचा मार्ग वाहतुकीसाठी वापरला जात असल्याने अपघाताला निमंत्रण देणारी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत राजकीय मंडळी, संघटनांनी समस्याग्रस्त देवपूरवासीयांना वाऱ्यावर सोडून दिल्याचे चित्र आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.