
State Minister Bachhu kadu
Sarkarnama
येवला : जळगाव येथील तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी (Education) देवीदास महाजन यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल होऊन निलंबन झाले होते. त्यांच्या गैरप्रकाराची (Corruption) आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होऊन फक्त निलंबनच नव्हे तर सेवेतून बडतर्फही केली जाईल, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली.
याबाबत आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता. त्याबाबत श्री. महाजन यांच्याविषयी शिक्षण उपसंचालकांचा अहवाल तातडीने मागितला जाईल. शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली असून त्याचे समूळ नष्ट करावे लागेल, असेही कडू म्हणाले.
महाजन यांनी सन २०१५ ते २०१९ या कालावधीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी त्यांची निलंबन होऊन चौकशी सुरू असताना पुन्हा समकक्ष पदावर पुनर्स्थापना कशी केली, असा सवाल शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षण राज्यमंत्री कडू यांनी हे उत्तर दिले.
नाशिकचे शिक्षण उपसंचालकांनी ३५० च्या वर मान्यता फाइल जप्त केलेल्या असून अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात केलेला भ्रष्टाचार असतानाही सदर शिक्षणाधिकारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी महाजन यांनी केलेल्या अनियमित कारभाराची चौकशी करून तत्काळ निलंबनाची व सीआयडी मार्फत चौकशीची कार्यवाही करण्याची मागणी दराडे यांनी केली. महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात सन २०१५ ते २०१९ या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, सदर कालावधीत सुमारे ७५० वैयक्तिक मान्यता दिल्या असून त्यापैकी ३५० मान्यता देत असताना लिपिक, अधीक्षक, उपशिक्षणाधिकारी यांची कोणतीही टिपणी नसताना शिक्षणाधिकाऱ्यांनी या वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत.
सदर मान्यतेच्या वेळी शाळेतील आरक्षण धोरण, पद मान्यता, संस्था ठराव नसतानाही, वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या. शिक्षणाधिकाऱ्यांनी विनाअनुदानित जागेवर बदली देत असताना एका जागेवर दोन बदली नियुक्ती, शाळेत पद नसतानाही विनाअनुदानितची मान्यता देणे, दिव्यांग प्रमाणपत्र नाहीत तरीही त्यांना दिव्यांग प्रवर्गातून मान्यता देणे, तसेच अनुकंपा मान्यता देत असताना अनुकंपाचा दावा एका शाळेत असेल तर त्यास दुसऱ्या शाळेत मान्यता दिलेली असणे, अशाप्रकारे विविध मान्यतेमध्ये सदर शिक्षणाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्याचे दराडे यांनी या प्रश्नात म्हटले होते. भ्रष्टाचाराच्या याच मुद्द्यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार नागो गणार, मनीषा कायंदे यांनी देखील सभागृहात आवाज उठविला.
दरम्यान, शिक्षणातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आयुक्त स्तरावर समिती नेमली जाईल. येत्या दोन महिन्यांच्या आत समिती अहवाल सादर करेल, त्यानंतर दोषी आढळून येणाऱ्यांवर सरसकट कारवाई केली जाईल, असे संकेत मंत्री कडू यांनी दिले. सदस्य किशोर दराडे यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील लक्षवेधी मांडली होती.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.