
पारनेरमधील नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी पिस्तूल रोखल्याच्या वादाला नगरपंचायतीमधील निवडणुकीची किनार असल्याचे समोर आले आहे. युवराज पठारे यांनी फिर्याद दिली असून, अल्पवयीन मुलासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. युवराज पठारे हे ठाकरे गटाचे नगरसेवक आहेत. तसेच ते विखे समर्थक मानले जातात. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, आमदार नीलेश लंके माजी सभापती काशिनाथ दाते यांनी पठारे यांची चौकशी केली आहे. (Ahmednagar Crime News)
नगरसेवक पठारे त्यांच्या मित्रांबरोबर पारनेर शहराच्या मुख्य चौकातील दिग्विजय हॉटेलसमोर होते. त्यावेळी तिथे काही युवक आले. त्यांनी पठारेंवर पिस्तूल रोखून गोळीबार केला. परंतु पिस्तुलाचा खट्ट असा आवाज आला. मात्र, गोळी उडाली नाही. यानंतर गोळीबार करणाऱ्या युवकाने पुन्हा प्रयत्न केला. तो प्रयत्नही फसला. पठारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत युवकाच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेतले. यानंतर युवकाने चाकू काढला. सावध झालेल्या पठारेंनी युवकाशी झटापट करत त्याच्याकडील चाकू हिसकावून घेतला. यानंतर युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. (Crime)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगरसेवक पठारे यांच्या फिर्यादीवरून गणेश चंद्रकांत कावरे, संग्राम चंद्रकांत कावरे, संग्राम चंद्रकांत कावरे, महेश राजू खेडेकर, ओमकार गणेश मुळे या चौघांसह एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरसेवक पठारेंवरील हल्ल्यामागे पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीतील वादाची किनार असल्याचे समोर आले आहे. नगरसेवक पठारे हे पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष आहेत. पारनेर क्रीडा संकुलामध्ये त्यांची तालीम आहे. चार-पाच वर्षांपूर्वी त्यांच्या तालमीशेजारीच आरोपी गणेश व संग्राम कावरे यांनी तालीम सुरू केली. यातून त्यांच्यामध्ये वाद आहेत.
पारनेर नगरपंचायत निवडणुकीत युवराज पठारे यांचे विरोधी उमेदवार महेश औटी यांचा प्रचार कावरे कुटुंबीयांनी केला होता. मतदानाच्या दिवशी गणेश कावरेने पठारेंना धमकावले होते. पठारेंच्या नातेसंबंधातील अजिंक्य पठारे यांच्या खुनाच्या प्रयत्न केल्याचा आरोपावरून संग्राम आणि गणेश कावरेंविरोधात गुन्हा दाखल आहे. या भांडणात देखील युवराज पठारेंनी मध्यस्थी केली होती. या सर्व प्रकाराचा राग धरून गणेश कावरे याने पठारे यांना धमक्या दिल्या होत्या, असे फिर्यादीत म्हटले आहे.
गोळीबार करण्यापूर्वी पठारेंवर पाळत ठेवली होती. चार दिवसांपासून ही पाळत ठेवली जात होती. युवराज पठारेंनी हल्लेखोर युवकाला पकडले. त्याच्या चौकशीत त्याने गणेश कावरे याचे नाव घेतले. तसेच हल्ला करण्यापूर्वी आम्ही चार ते पाच दिवसांपासून पाळत ठेवून होतो, याची कबुली दिल्याचे युवराज पठारेंनी सांगितले. हल्लेखोराबरोबरच आणखी दोन साथीदार होते. ते पसार झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.