सुरगाणा: (Nashik) श्रम, समता आणि गरीबांच्या कल्याणाला प्राधान्य देतधर्मापासून (Religion) चार हात लांब राहण्याचा आग्रह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (CPM) धरला जातो. सातत्याने धर्माविरोधात गरीब, आदिवासींच्या (Trible) कल्याणाची संकल्पना मांडणाऱ्या या पक्षाचे नेते, माजी आमदार जे. पी. गावित (J. P. Gavit) यांनी काल श्री स्वामी समर्थ मठातर्फे आयोजित पादुका पूजनाच्या धार्मिक सोहळयात सेवेकऱ्यांचे स्वागत करीत सहभागी झाले. त्यामुळे हा कार्यक्रम चागंलाच चर्चेचा विषय ठरला. (CPM leader J. P. Gavit welcomes the doctrine in childhood)
यावेळी आमदार गावित यांनी श्री स्वामी समर्थ मठातर्फे आयोजित केलेल्या पादुका पूजन सोहळयात सेवेकऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. लहान मुलांवर परिसरात घडणाऱ्या कार्यक्रमांतून संस्कार होत असतात, परिसरातील वातावरण भक्तिमय असेल तर मुलांवर चांगले संस्कार होतात. तुम्ही संस्कारी असाल तर तुमची मुलेही संस्कारी होतील. संस्काराशिवाय जीवन जगणे कठीण आहे. बालमनावर संस्कार करून आदर्श नागरिक घडवण्याचे काम सेवेकऱ्यांनी करावे, असे आवाहन केले.
श्री. गावित म्हणाले, की गेलेली वेळ आणि संधी पुन्हा येत नाही. मुलांना योग्य वयात संस्कार देणे गरजेचे आहे. मुलांना योग्य वयात धार्मिकतेचे व शिस्तीचे धडे देण्याचे कार्य श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी करावे. लहान मुले देवासारखीच असतात. त्यांना आत्मनिर्भर बनवा, चूक केली असेल, तर माफ करा, चांगल्या कामासाठी त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा द्या. संस्काराला स्वतःपासून सुरवात करा. एका चुकीच्या माणसाकडे गावाची सत्ता गेली, तर सारे गावाला परेशान व्हावे लागते. मुलांना श्रद्धा व अंधश्रद्धा समजून सांगा.
मठाध्यक्ष नितीन महाले म्हणाले, की स्वामींचे नामस्मरण केले तर तुमच्या आयुष्यातील संकटे केव्हा निघून जातील, हे तुम्हाला कळणारही नाही. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’ स्वामींचे हे वाक्य अटल सत्य आहे. आपण जे कर्म करतो, त्याचे फळ आपल्या मुला-बाळांना मिळते, म्हणून चांगले कर्म करा. स्वामींचे नामस्मरण करा. मनापासून केलेल्या भक्तीतूनच ऊर्जा व प्रेरणा मिळेल.
अक्कलकोट येथील चोळप्पा महाराज यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच्या पादुका दिल्या, त्या पादुका चोळप्पा महाराजांचे वंशज महेश जगन्नाथ पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरगाणा येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या सौजन्याने मंगळवारी (ता. २७) आगमन झाल्यावर भाविकांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
मठाचे मठाध्यक्ष महाले यांच्या निवासस्थानापासून रथयात्रा व मिरवणूक सोहळ्यास सायंकाळी साडेसहाला सुरवात झाली. रथयात्रेत आतषबाजी करण्यात आली. वाजतगाजत मिरवणूक सुरगाणा शहरातून जाताना महिलांनी पादुकांचे पूजन केले. अक्कलकोटचे पुजारी महेश जगन्नाथ गुरुजी माऊली श्री. नितीन महाले यांचे औक्षण केले. तरुण व महिलांचा प्रचंड उत्साह रथयात्रा सुरू असताना वाजतगाजत मिरवणूक साडेआठला मठात पोचली. दरम्यान माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, संस्थेचे संचालक व सरपंच हिरामण गावित,रामदास महाले यांनी मिरवणुकीत पादुकांचे दर्शन घेतले. भाविक नागरिक व महिलांनी महाले यांचे औक्षण केले. पादुकांचे पूजन करून दर्शन घेतले. रात्री आठ मठाध्यक्ष नितीन महाले, धर्मेंद्र पगारिया यांनी मार्गदर्शन केले. साडेनऊला महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. बुधवारी सकाळी यजमानांच्या हस्ते पाद्यपूजा महाअभिषेक, चोळप्पा महाराजांचे वंशज महेश जगन्नाथ गुरुजी अक्कलकोट यांच्या प्रमुख उपस्थितीत १०१ यजमानाच्या हस्ते पाद्यपूजन सोहळा झाला.
नगराध्यक्ष भरत वाघमारे, नगरसेवक सचिन आहेर, भगवान आहेर, सचिन महाले, सुनीता पाटील, विलास सूर्यवंशी, महेश देशपांडे आदींचा सत्कार झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मठाध्यक्ष नितीन महाले, कार्याध्यक्ष, हर्षवर्धन महाराज, धर्मेंद्र पगारिया, उत्तम पगारिया, विशाल शिरसाठ, हरिश्चंद्र अहिरे, प्रशांत मोरे, प्रसाद पवार, ओम जंगम, नीलेश थोरात, प्रवीण आहेर, अजय सोनवणे, ओमकार जंगम ,किशोर सोनवणे, तुषार मोरे, मनोज महाले, हेमंत साधंनशिव, पप्पू सोनवणे, चेतन हिरे, रंगनाथ गांगुर्डे आदींनी प्रयत्न केले
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.