राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News: नगर जिल्हा काही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे पुरता हादरला असून भररस्त्यांवर होणाऱ्या हत्यांमुळे नागरिक दहशतीखाली आणि भीतीच्या वातावरणात आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरलेले असताना जिल्ह्यात होणाऱ्या लव जिहाद आणि धर्मांतर अशा आरोपातील घटनांवर सत्तेतील भाजप जिल्ह्यात आक्रमक झाले आहे.
या सर्व घटनांवर आता सत्ताधारी, विरोधीपक्ष आणि सामान्य नागरिकांच्या तोफेवर नगर जिल्हा पोलीस आले असून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधी पक्ष विधिमंडळात गृहमंत्री आणि त्यांच्या विभागाला जाब विचारत असताना खुद्द पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात क्राईम रेट वाढल्याची कबुली दिली आहे.
तर राहुरी तालुक्यातील उंबरे येथील लव जिहाद आणि धर्मांतराच्या प्रश्नावर जिल्ह्यात भेटीला आलेल्या भाजप आमदार प्रसाद लाड यांनी तर जिल्ह्यातील गुप्तचर शाखा आणि महत्वाच्या गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखा काय करत आहे?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात अवैध व्यवसायातून गामा भागानगरे, जागेच्या ताबा प्रकरणातून अंकुश चत्तर तर प्रॉपर्टी वादातून निवृत्त लष्करी जवानाची हत्या झाल्याचे उघड झाले. आयपीसी 302 आणि आयपीसी 307 अशा गंभीर घटनांसह दरोडे, लूटमार आणि हत्या, अवैध व्यवसाय, गावठी पिस्तुलांची खरेदी-विक्री अशा घटनांत नगर शहर आणि जिल्ह्यात झालेली वाढ पालकमंत्र्यांनीच कबूल करत जिल्ह्यात क्राईम रेट वाढल्याचे म्हंटले आहे.
जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण यामुळे जिल्ह्याला पाचशे ते सहाशे वाढीव पोलीस बळ आवश्यक असून त्यासाठी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे विनंती करण्यात आल्याची महिती विखे यांनी दिली.
तर राहुरी तालुक्यातील उंबरे लव जिहाद प्रकरणावरून प्रसाद लाड यांनी तर जिल्हा पोलीस दलाच्या गुप्तचर विभाग आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा काय करते, असे म्हणत अशा घटनांना संबंधित पोलीस विभाग जबाबदार असल्याचा रोख व्यक्त केला.
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना आणि निरवैध सुरू असलेले अवैध व्यवसाय यांची कुठेतरी सांगड असल्याचे बोलले जात असून वाढत्या गुन्हेगारी घटना, आणि जातीय संघर्षाच्या घटनांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच मुंबईत गृहमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पोलीस, प्रशासनाच्या सर्वच विभागाच्या वरिष्ठांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहितीही आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.