Malegaon Politics : अतिवृष्टीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागांमध्ये हजारो कोटींची हानी झाली आहे. पण त्यानंतरही नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सर्वत्र महायुतीचीच सरशी होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त करीत आहेत. बहुतांश महापालिका आम्हीच जिंकू, असे ते म्हणतात.
पण एका महापालिकेतील फडणवीस साशंक आहेत. जिंकण्यास अवघड अशी एखादी तरी महापालिका असेलच ना? असे विचारले असता ‘फक्त मालेगाव’, असा क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री फडणवीस हसत हसत उत्तरले. त्यामुळे निवडणुकीआधीच त्यांनी मालेगाव महापालिकेतील भाजपचा पराभव हसत हसत मान्य केला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
आजवर एकाही निवडणुकीत मालेगाव महापालिकेत भाजपला दोन आकडी संख्या ही गाठता आलेली नाही. त्याला येथील भौगोलिक आणि मतदारांची राजकीय मनोभूमिका कारणीभूत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला येथून फारशी अपेक्षा नाही. या शहराची लोकसंख्या सुमारे 10 लाख आहे. यामध्ये 62 टक्के मतदार मुस्लिम आहेत. शहराच्या बहुतांश भागात काँग्रेस, एमआयएमचे वर्चस्व आहे. त्याचवेळी शहराच्या पश्चिम भागात मुस्लिमेतर मतदार आहेत. तिथे मात्र भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरस असते.
मालेगाव महापालिकेत 84 जागा आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या होत्या. यामागे काँग्रेसचे नेते आणि दिवंगत माजी आमदार रशीद शेख यांचा प्रभाव कारणीभूत होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल युतीला 26 जागा होत्या. एकत्रित शिवसेनेला 13, भाजपला 9, एमआयएम 7 आणि अपक्ष प्रत्येकी एक जागा मिळाली होती. मागील 9 वर्षांमध्ये परिस्थिती बरीच बदलली असली तरीही भाजपला अनुकूल नक्कीच नाही, ही गोष्ट फडणवीस यांनाही उमगलेली दिसते.
गत निवडणुकीवेळी आसिफ शेख हे काँग्रेसचे आमदार होते. त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. 2019 मध्ये एआयएमआयएमच्या मुफ्ती इस्माइल यांनी आसिफ शेख यांचा पराभव केला. त्यानंतर 2022 मध्ये आसिफ शेख यांनी काँग्रेसचा राजीनामा देत वडील शेख रशीद यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर, त्यांनी अजित पवार यांची साथ देणे पसंत केले. 2023 मध्ये राशीद शेख यांचे निधन झाले. तर आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून ‘इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र’ म्हणजे ‘इस्लाम’ हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे.
आता 'एमआयएम' चे आमदार मौलाना मुफ्ती आणि आसिफ शेख यांच्यात वर्चस्वासाठी तुळशीची लढत होईल. आमदार मौलाना मुक्ती आणि माजी आमदार असेच शेख यांच्यात निवडणूक जाहीर होण्याआधीच जोरदार राजकीय आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत. रात्रीची नमाज होताच कार्यकर्ते आणि समर्थक चर्चेत रमतात. असे असले तरी आमदार मुफ्ती आणि माजी आमदार शेख यांना सत्तेत येणं शिवसेना, मंत्री दादा भुसे किंवा भाजप यांच्या मदतीशिवाय शक्य नाही.
यंदा पश्चिम भागातील हिंदू मतांवर दोन्ही शिवसेना आणि भाजपचा दावा असेल. याशिवाय विधानसभेत अपक्ष उमेदवारी केलेल्या बंडू काका बच्छाव आणि भाजपमधून बाहेर पडलेले सुनील गायकवाड काय भूमिका घेता याला महत्त्व आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांना अस्पृश्य मानले जाणारे पक्ष मालेगावात निकालानंतर सत्तेसाठी एकत्र आलेले नेहमीच दिसतात. मतदारांना मतदानासाठी मात्र भाजप अस्पृश्य वाटतो. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या आधीच तेथील भाजपचा पराभव मान्य केला असावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.