नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर (Nagpur) मेट्रोचा (Metro) ११ डिसेंबरला लोकार्पण सोहळा होणार असून, त्याच दिवशी नाशिक (Nashik) मेट्रो निओ संदर्भातदेखील पंतप्रधानांकडून निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून लालफितीत अडकलेला निओ मेट्रो प्रकल्पाला गती मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (PM Modi may announcement of Nashik city neo metro in Nagpur)
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर २०१८ रोजी नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको आणि महामेट्रोने केले. नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली होती.
त्या प्रकल्प अहवालानुसार टायरबेस मेट्रो सेवेसाठी दिल्ली येथील राईटस कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. ऑगस्ट २०१९ मध्ये ‘मेट्रो निओ’ असे प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला.
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मेट्रो निओ प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली. प्रकल्पासाठी २१००.६ कोटी खर्च येणार असून राज्य सरकार, सिडको व महापालिकेचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये तर १, १६१ कोटी कर्ज स्वरूपात उभारले जाणार आहे. प्रकल्पासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. कोरोनामुळे मेट्रो निओ प्रकल्पाला फटका बसला. कोरोनाचा अडथळा आला नसता तर आतापर्यंत एजन्सी नियुक्त होऊन प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली असती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात प्रकल्पासाठी प्रयत्न होत आहे.
नाशिक व वाराणसीमध्ये एकाच वेळी दोन्ही प्रकल्प साकारण्याची चर्चा होती. त्यामुळे नाशिकच्या प्रकल्प मंजुरीला विलंब होत असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर विधानसभा मतदारसंघातातदेखील प्रकल्प सुरू करण्याची चर्चा होती. २५ जानेवारी २०२२ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता, मात्र घोषणा झाली नाही. नाशिकच्या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे, परंतु कॅबिनेटची मंजुरी मिळालेली नाही. आता नागपूर मेट्रो उद्घाटनाच्या निमित्ताने नाशिक मेट्रो निओचा नारळदेखील फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकल्पाची मुदत वाढणार
नाशिक मेट्रोसाठी २०२३ ची डेडलाईन होती, परंतु अद्यापपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी न मिळाल्याने काम सुरू झाले नाही. त्यामुळे आता प्रकल्पाला मंजुरी मिळाली तरी प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. केंद्र सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कडून पहिल्या कॉरिडॉर साठी ३६ व दुसऱ्या कॉरिडॉरसाठी १४ असे एकूण पन्नास डब्याचे (कोच) डिझाईन, उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.