
Ahilyanagar News : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रचंड मोठा प्रतिसाद देत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मराठा समाजातील बांधव मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानात होत असलेले हे मनोज जरांगे पाटलांचं (Manoj Jarange Patil) आंदोलन रोखण्यासाठी सरकारनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याचदरम्यान, शिर्डीतून सर्वात मोठी राजकीय अपडेट समोर आली आहे.
मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना आझाद मैदानावर एक दिवसासाठी आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी अनेक अटीशर्ती ठेवण्यात आल्या आहेत. तर जरांगे हे आपल्या आंदोलनावर ठाम असून त्यांनी पोलिसांची एक दिवसाची अट सोडून सगळ्या गोष्टी मान्य असल्याचं ठणकावलं आहे.
पण आता मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे यांना थोपवण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचलल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री शिर्डीत भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड जरांगे पाटलांच्या मोर्चाला कसं रोखायचं याबाबत खलबतं झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिर्डीत मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट झाल्याचंसमोर आल्यानं तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचाच मुख्य मुद्दा चर्चेत असल्याचंही बोललं जात आहे.
या बैठकीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आपल्या व्यक्तिगत कामासाठी मला भेटले असल्याचं सांगितलं. तसेच यावेळी आमच्यात जरांगेंच्या आंदोलनावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं. जरांगे पाटलांबरोबर चर्चा करण्याचा विषयच नाही. पण त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यांनी भेटण्याची आणि चर्चेची भूमिका मांडली तर आम्ही नक्की विचार करू असंही विखे यांनी नमूद केलं.
याचवेळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या ताफ्यातल्या वाहनांवर दगडफेक करण्याची माहिती मिळत आहे. ही दगडफेक नेमकी कोणी केली? आणि का केली? याबाबत काही सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
पण या दगडफेकीत एक पिकअप आणि एक स्कार्पिओ गाडीच्या काचा फुटल्या असून त्यात एकजण जखमी झाला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करत संबंधित गाड्या पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.