Congress News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी शेतकऱ्यांच्या पीक विम्यासह विविध प्रश्नावर काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना थेट अटक करण्यात आली. यावरून चांगलेच राजकारण रंगले आहे.
काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांसह उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी विनंती केली होती. जिल्हाधिकारी तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयालाही व्हाट्सअप वर संदेश पाठविला होता. काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याच्या तयारीत होते.
मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याचा एवढा धक्का घेतला की, त्यातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एक नवा राजकीय विषय मिळाला. उपमुख्यमंत्री फडणवीस सोमवारी शिंदखेडा येथे उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन समारंभासाठी येणार होते. माजी मंत्री जयकुमार रावल यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सनेर यांना उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती. मात्र या शिष्टमंडळाला भेट देण्याऐवजी पोलिसांनी वेगळेच उपाय केले. पहाटे पाचलाच पोलीस उपअधीक्षक आणि तीन उपअधीक्षकांसह पोलिसांचे पथक काँग्रेस नेते सनेर यांच्या निवासस्थानी पोहोचले.
यावेळी पोलिसांनी श्री सनेर यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र श्री समीर घरी नव्हते. पोलिसांनी त्यावर श्री सनेर यांना त्यांच्या घरात शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी बेडरूम, टेरेस, टॉयलेट, स्वयंपाक घर आणि अगदी बाथरूम देखील तपासण्यात आले.
एका पथकाने तपासणी केल्यावर सतर्क असलेल्या पोलिसांनी दुसरे पथक पाठवून देखील बाथरूम पासून बारीकसारीक गोष्टींचा तपास केला. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. श्री सनेर घरी नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनाही पोलिसांनी हैरान करून सोडले.
दुपारी सव्वा अकराला श्री सनेर आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी सभास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. श्री फडणवीस मुंबईला परत गेले. तोपर्यंत या सर्वांना पोलिसांनी स्थानबद्ध करून ठेवले होते.
पोलिसांच्या या कारवाईमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. यावेळी श्री सनेर म्हणाले, पीक विम्याचे पैसे शेजारच्या जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात मिळाले आहेत. मात्र धुळे जिल्ह्यातील शेतकरी त्यापासून वंचित आहेत. बदलापूर सारख्या घटना राज्यभर घडत आहेत.
अशा विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांना आम्हाला निवेदन द्यावयाचे होते. त्यासाठी आम्ही रीतसर परवानगीसाठी विनंती देखील केली होती. मात्र आम्हाला भेट देण्याऐवजी त्यांनी थेट पोलीस पाठवून अटक केली. देवेंद्र फडणवीस काँग्रेस पक्षाला एव्हढे का घाबरतात? हे आम्हाला समजत नाही.
राज्याचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जनता आणि विरोधी पक्षाच्या प्रश्नांना समजून घेतले पाहिजे. त्याऐवजी सध्याचे सरकार विरोधी पक्षाला घाबरते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले होते. त्यांनी देखील असेच दडपशाही केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तोच कित्ता गिरवला.
हे सरकार विरोधकांना शत्रू सारखी वागणूक दिल्याची भावना आणि संदेश सगळीकडे गेला आहे. शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीच केले नाही. पिक विम्याचे पैसे देखील मिळाले नाही. अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळेच तर राज्य सरकारने काँग्रेस पक्षाचा धसका घेतला नाही ना, असा प्रश्न त्यांनी केला.
प्रशासनाने मात्र निवेदन देण्यास देखील परवानगी नाकारली. जिल्हाध्यक्ष सनेर, पदाधिकाऱ्यांना सभेच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. यावेळी कार्यकर्त्यांनी फलक हाती घेत घोषणा दिल्या. माजी सभापती प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, शामकांत पाटील, आबा मुंडे, महेंद्र पाटील, प्रविण पवार, उपसरपंच कलमाडी, विरेंद्र झालसे, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, पंजाबराव पवार, नेवबा पठाण, भैय्या माळी, ईश्वर पाटील, विलास पाटील यांनी यावेळी पोलिसांचा निषेध केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.