

Nashik News : नाशिकमध्ये काही तृतीयपंथींना धर्मांतरासाठी धमकाविण्यात येत असल्याचा निषेध नोंदवण्यासाठी किन्नर आखाड्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजाने मोर्चाला पाठिंबा देत सहभाग घेतला. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार देवयानी फरांदे या देखील या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चाचे नेतृत्वच आमदार फरांदे यांनी केल्याने नाशिकमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
हिंदू किन्नर आखाड्यावर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने हिंदू किन्नरांचे बळजबरीने धर्मांतर करण्याचा डाव असल्याचं हिंदू किन्नर आखाड्याने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. सलमा गुरू आणि तिच्या साथीदारांनी पारंपरिक पद्धतीने देवदेवतांची पूजा करायची नाही म्हणून धमकी देत धार्मिक भावना दुखावल्या. सलीम उर्फ सलमाने किन्नर शुभांगी शिंदे हिला धर्मांतरासाठी धमकावले. याचा निषेध करण्यासाठी घारपुरे घाट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा नेण्यात आला.
सलमा गुरूची शिष्या अब्दूल शेख ऊर्फ पार्वती पाटील हिने 'धर्मांतर कर, नाहीतर १५ लाख रुपये दे' अशी मागणी केल्याने नाशिकच्या पंचवटी पोलिस स्टेशन येथे खंडणीचा व जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघींना अटक व्हावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून मोर्चात करण्यात आली. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आली आहे.
आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक येथे आयोजित या विराट जनआक्रोश मोर्चा व हिंदू किन्नर स्वाभिमान सभेमध्ये सहभागी होत हिंदू किन्नर समाजातील बांधवांचे होत असलेले धर्मांतरण आणि त्यांच्या हक्कांवरील अन्यायाविरोधात ठाम आवाज उठवला.
हिंदू समाजातील कोणत्याही घटकावर अत्याचार किंवा जबरदस्तीचे धर्मांतरण सहन केले जाणार नाही. राज्यात हिंदूंचे सरकार असल्यामुळे हिंदू धर्मावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, ही स्पष्ट भूमिका यावेळी मांडली. तसेच धर्मांतरण बंदीचा कडक कायदा लवकरात लवकर लागू व्हावा यासाठी विधिमंडळात ठामपणे आवाज उठवणार असल्याचं आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.