

Dhule crime case : पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून थांबण्याचे नाव घेतना दिसत नाही. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण पुढे आल्यापासून दोन महिन्यात तब्बल ३५ भोंदूबाबांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना गजाआड केलं आहे. असे असताना आता उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून अंधश्रद्धेची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा भोंदूबाबाच्या मठात भयानक अंत झाला आहे.
साक्री तालुक्यातील जैताणे येथे एका भोंदूबाबाने शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी आलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. निजामपूर पोलिसांनी अतिशय वेगात तपासाची चक्र फिरवून अवघ्या दोन तासांच्या आत या भीषण दुहेरी हत्याकांडाचा छडा लावला असून, संशयित मांत्रिक योगेश बापू खैरनार (रा. जैताणे, ता. साक्री) याला अटक केली आहे.
जयश्री रजनीकांत काकुस्ते आणि अक्षय गंगाधर सोनवणे असे हत्या झालेल्या दोघा मित्र-मैत्रिणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत जयश्री ही एका फायनान्स कंपनीत नोकरीला होती, तर अक्षय हा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता. तसेच त्याचा वडिलोपार्जित केबलचा व्यवसाय देखील होता.
साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव रस्त्यावरील टेंबे फाट्याजवळ एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले होते. हा अपघात वाटावा यासाठी तिच्या मृतदेहावर एक बेवारस दुचाकी टाकून देण्यात आली होती.घटनेचे गांभीर्य ओळखून निजामपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मृतदेहाजवळ एक मोबाईल आढळून आला. त्यावरून तपास केला असता ती महिला जयश्री रजनीकांत काकुस्ते (हिरे, रा. कासारे, ता. साक्री) असल्याचे निष्पन्न झाले.
केसरी रुमालाने...
घटनास्थळाचा पंचनामा करतेवेळी पोलिसांना एक केसरी रंगाचा रुमाल आढळून आला. हाच रुमाल हे प्रकरण सोडवण्यासाठी महत्वाचा धागा ठरला. पोलिसांकडून श्वान पथकाला हा रुमाल सुंघवण्यात आला असता, श्वानाने माग काढत थेट भोंदूबाबा योगेश ऊर्फ भैय्या बापू खैरनार (रा. जैताणे) याच्या मठाचा रस्ता गाठला. पोलिसांनी संशयावरून तात्काळ या भोंदूबाबाला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना वेगळ्याच कहाण्या सांगितल्या. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अन् वाद झाला....
मृत जयश्रीचे काका संजय हिरे यांनी निजामपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री आणि अक्षय हे दोघे शनी अमावस्येच्या रात्री विशेष पूजेसाठी भोंदूबाबा योगेश खैरनार याच्या आश्रमात गेले होते. तेथे पूजाविधी सुरू असताना त्यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला. यानंतर भोंदू बाबाने संतप्त होऊन अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्याला संपवले. तर जयश्रीचा ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला. (Dhule Crime)
अक्षयचा मृतदेह पुरला..
पोलिसांनी खाक्या धाखवताच भोंदू बाबा योगेश खैरनार पोपटा सारखा बोलू लागला. त्याने अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळ उभांरडी येथील शिवारात नेऊन पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ उंबरांडी शिवारातून अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, मृतदेह वाहून नेण्यासाठी त्याने बैलगाडीचा वापर केला होता, बैलगाडीच्या चाकांचे निशाण जमिनीवर उमटले होते ते पोलिसांच्या लक्ष्यात आले .या प्रकरणी आरोपी भोंदू बाबा योगेश खैरनार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.