Dr Bharti Pawar News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉ भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्यात चुरशीची लढत आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघात (Chandwad Constituency) भाजपने शेवटच्या टप्प्यात केलेल्या अखंड परिश्रमाने हे वातावरण बदलण्यात ते यशस्वी ठरले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात त्याचे वेगळे वैशिष्ट्य होते. चांदवड- मतदारसंघ या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. त्याचे तीव्र पडसाद येथे उमटले. विरोधी पक्षांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला. केंद्र सरकार विरोधात मोठी राजकीय वातावरण निर्माण केले. परिणामी भाजपसाठी येथे प्रारंभी नकारात्मक वातावरण होते.
या मतदारसंघात गेल्या दोन टन भाजपचे राहुल आहेर आमदार आणि भारती पवार खासदार आहेत. भाजपकडे दुहेरी सत्ता असल्याने मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र केंद्र सरकारचे धोरण याच्या विपरीत असल्याने या दोन्ही लोक प्रतिनिधींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषत: निवडणुकीत उमेदवार असलेल्या डॉ पवार (Bharati Pawar) यांना त्यासाठी विरोधकांशी मोठी झुंज द्यावी लागली. त्यात पक्षाची यंत्रणा त्यांच्या मदतीला आली. विशेषतः मंत्री गिरीश महाजन, भाजपची प्रदेश टीम, आमदार आणि बूथ स्तरावरील यंत्रणा एकाच वेळी सक्रिय होते. शेवटच्या पाच दिवसात बूथ स्तरापर्यंत नाराजी दूर करून प्रत्येकाला खुष करण्यात आले. त्यातून भाजपची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली. निवडणूक उभी करण्यात हा पक्ष यशस्वी झाला. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस गाफील पहिल्याचे दिसून आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चांदवड मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहे. निर्यात बंदी झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याला हजारो रुपयांची झळ सोसावी लागली. ही आर्थिक झळ कोणत्याही प्रकारे भरून निघू शकत नव्हती. मात्र या तालुक्यात चांदवड शहरात भाजपचे यंत्रणा आहे. त्यांनी पक्षासाठी या नाराज शेतकऱ्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. शेतीवरून निवडणुकीचा फोकस विकास कामांकडे करण्यात आला. त्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची सभा महत्त्वाची ठरली. या सभेने देखील वातावरण निर्मितीसाठी भाजपला मोठी मदत झाली. आमदार आहेर, जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, डॉ आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल यासह विविध पदाधिकारी पक्षाच्या कामात सक्रिय होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना सुरुवातीपासून व्यक्तिगत विरोधी प्रचाराला सामोरे जावे लागले. माकबला हा मतदारसंघ हवा होता. त्यामुळे आमदार माजी आमदार जे. पी. गावित (J. P. Gavit) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेवटच्या टप्प्यात त्यांनी उमेदवारी मागे घेऊन पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला चांदवडमध्ये त्याचा लाभ झाला.
कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांदवड येथे येऊन रास्ता रोको केला. त्यामुळे मोठी वातावरण निर्मिती झाली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान चांदवड येथे कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद केला. या सभेने भाजप विरोधात वातावरण पेटविले. त्याचा परिणाम शेवटपर्यंत मतदारांवर टिकून राहिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर सयाजी गायकवाड येथे सक्रिय होते. मात्र या सगळ्यांपेक्षा शिवसेनेची यंत्रणा त्वेषाने कामाला लागली होती. त्यांनी भाजपच्या प्रचाराला गाव पातळीवर जेरीस आणले. त्यामुळे महाविकास आघाडीचे वातावरण टिकून राहिले.
लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या डॉ पवार यांना चांदवडमधून एक लाख 20 हजार703 मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा 80,610 मतांची आघाडी घेतली होती. यंदा त्यांना किती आघाडी मिळते, याची उत्सुकता आहे. भगरे समर्थकांना मात्र काहीही झाले तरी वीस ते पंचवीस हजारांची आघाडी मिळेल असा आत्मविश्वास आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.