Ahmednagar News: अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेने आपल्या हक्काच्या शेकडो एकर जागा भंडारदरा, निळवंडे धरणांसाठी दिल्या. गावे विस्थापित झाली, पण आज हक्काचे पाणी स्थानिकांना न मिळता समन्यायी कायद्याला पुढे करून जायकवाडीला दिले जाते.
तसेच धरणावरील उच्चस्तरीय कालव्यांची कामे पूर्ण करू, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देऊन ते पूर्ण केले गेले नाही. याचा निषेध म्हणून शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.
अकोले तालुक्यातील धरणांवरील उच्चस्तरीय कालवे 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करू, असे आश्वासन महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले होते. मात्र, अद्यापही उच्चस्तरीय कालव्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. अशात आता निळवंडेमधून 3 टीएमसी पाणी जायकवाडीला देण्याचा निर्णय झाला आहे.
जायकवाडीला पाणी दिल्यास पाणीपातळी 642 तलाकांच्या खाली गेल्यास कालव्यातून पाणी पुढे जाणार नाही. यामुळे अकोल्यातील आदिवासी, शेतकरी संतप्त झाले असून, आज पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांनी सरकार, तसेच जलसंपदा विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या.., इन्कलाब जिंदाबाद, याच बरोबर विखे पाटील मुर्दाबाद.., पालकमंत्री मुर्दाबाद..," अशा घोषणांनी जलसंपदा कार्यालय आंदोलनकर्त्यांनी दणाणून सोडले होते.
"उच्चस्तरीय कालव्यातून पाणी देऊन अकोले तालुक्यातील वंचित गावांना न्याय देण्याची सातत्याने मागणी केली गेली. मात्र, राज्य सरकरचे मंत्री आणि जलसंपदा विभाग केवळ आश्वासन देत आलं आहे. नुकतेच जलपूजन कार्यक्रमात पालकमंत्री विखे यांच्यासमोर डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली पाणी हक्क संघर्ष समितीने जोरदार आंदोलन केले होते.
त्यावेळी विखे यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत कालवे पूर्ण केले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कालवे तर पूर्ण झाले नाही, उलट जायकवाडीसाठी 3 टीएमसी पाणी दिले जाणार असल्याने अकोले तालुक्यातील वंचित गावे अडचणीत येणार आहेत", असे नवले यांनी स्पष्ट केले.
जायकवाडीला पाणी सोडण्याअगोदर उच्चस्तरीय कालव्यांची कामे पूर्ण व्हावीत, तसेच कालव्यातून पाणी वाहते व्हावे म्हणून धरणातील पाण्याची पातळी 642 तलाकांच्या वर असावी, रब्बी हंगामासाठी किमान तीन आवर्तन देता येतील इतके पाणी उपलब्ध ठेवा, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
आंदोलन सुरू असताना जलसंपदाचे अधिकारी उपस्थित नसल्याने या वेळी आंदोलकांनी कार्यालयाला टाळे ठोकले. जोपर्यंत मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत जलसंपदाला लावलेले टाळे उघडणार नाही, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.