Nashik-Marathwada Water issue : नाशिकच्या धरणातील पाणी मराठवाड्यातील जायकवाडीला सोडण्याचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. या विषयावर नगर जिल्ह्यात नेत्यांमध्ये तू तू-मै मै झाल्यानंतर नाशिकमध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदेदेखील मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी पाणी सोडण्यास विरोध केल्याने सरकारला या विषयावर थेट घरचा आहेर मिळाला आहे. (Farmers from Nashik also opposed to release Water from Nashik to Jaikwadi Dam)
यंदा पावसाने दगा दिल्याने (Water) टंचाईची स्थिती आहे. त्यातच समन्यायी पाणीवाटप सूत्रानुसार मराठवाड्यासाठी नाशिक (Nashik) व नगरच्या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने (Maharashtra Government) घेतला आहे. त्याला नाशिकमधून भाजपच्या (BJP) आमदार फऱांदे यांनी विरोध सुरू केल्याने भाजपमध्येच जुंपण्याची शक्यता आहे.
या विषयावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. नाशिकच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. समन्यायी पाणीवाटपाचा त्याला संदर्भ आहे. जेव्हा पाण्याचा तुटवडा असतो, तेव्हा हा प्रश्न हमखास निर्माण होतो. त्यामुळे याबाबत प्रशासन योग्य नियोजन करीत नाही. त्याचा फटका नाशिकला बसतो. त्यामुळे याबाबत फेरविचार व्हावा, असे भाजपच्या आमदार फरांदे यांनी म्हटले आहे.
या वादात नाशिक-मराठवाडा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्हे असून, नाशिकहून जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नाशिकमधे दुष्काळी परिस्थिती असताना पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यात राज्य शासनाचा जलसंपदा विभाग काय भूमिका घेतो, याला महत्त्व आहे. ही सुनावणी लांबण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दुसरीकडे शेतकरी मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून साडे आठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला आहे. हा निर्णय झाल्यापासून नाशिकच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
एकीकडे नाशिक जिल्हयात तीव्र दुष्काळजन्य स्थिती असताना नाशिकचा विचार न करता गंगापूर, दारणा धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या विषयावरील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. त्यात भाजपच्याच आमदाराने विरोध सुरू केल्याने हा सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.