Eknath Khadse News: भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकनाथ खडसे यांची कोंडी केली. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात यु टर्न घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र या पक्षातील स्थानिक नेत्यांनीही खडसे यांना अटी शर्ती घालण्यास सुरवात केली आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झटका दिला होता. त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात काम केले.
केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी देखील त्याची कबुली दिली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आरोप करीत खडसे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचे संकेत दिले होते. त्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातही उमटले आहेत.
या संदर्भात पक्षाचे नेते माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी खडसे यांना चांगलेच सुनावले आहे. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यायचे असल्यास अटी शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे जळगावच्या राजकारणात श्री खडसे यांना भाजप बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी देखील पक्षात घेण्यास विरोध करण्यास सुरवात केल्याचे चित्र आहे.
या संदर्भात माजी मंत्री पाटील यांनी तर श्री खडसे यांचे नाव न घेता थेट आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात लोकसभेच्या दहा जागा लढवल्या. त्यातील आठ जागा जिंकल्या. दोन जागांवर पराभव झाला. रावेर मतदारसंघात स्थानिक गद्दारामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
श्री खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतणार असे संकेत त्यांनी दिले. त्याचे पडसाद भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात देखील उमटले आहेत. एकंदरच सूनेसाठी भाजपमध्ये गेले. आता रावेर विधानसभा मतदारसंघात कन्या रोहिणी खडसे यांच्यासाठी ते भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत.
एकंदरच त्यांचे हे धरसोडीचे राजकारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तग धरणार का? अशी शंका व्यक्त होत आहे. रावेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अनेक नवे आणि प्रबळ इच्छुक उमेदवार तयार झाले आहेत.
या सगळ्या इच्छुक तसेच पदाधिकाऱ्यांनी श्री खडसे यांच्या स्वगृही परतण्याला नाक मुरडले आहे. परतायचे असल्यास अमुक करा, तमक्याची माफी मागा, अशा स्वरूपाच्या अटी शर्ती ही थेट पक्षाच्या मेळाव्यात घालण्यात आल्या. त्यामुळे आगामी काळात श्री खडसे यांचे राजकारण कोणत्या दिशेला वळणार, हा निर्णय सर्वस्वी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.