Dhule News: धुळे लोकसभा मतदार संघासाठी (Dhule constituency 2024) काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आहे. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव (DR Shobha Bachhav) यांची बुधवारी रात्री उशिरा उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धुळे मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार कोण? यावर अनेक दिवसांपासून खल सुरू होता. प्रबळ उमेदवार मिळत नसल्याने रोज नवे पर्याय पुढे येत होते. धुळ्याचे जिल्हाअध्यक्ष शाम सनेर आणि नाशिकचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे ही नावे घेतली जात होती. शेवटी गेल्या चार दिवसातील घडामोडींनंतर पक्षाने शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कॉग्रेस उमेदवारीच्या वादावर पडदा पडला आहे.
डॉ. बच्छाव या मूळच्या मालेगाव येथील आहेत. त्यांचे आजोळ धुळे येथील आहे तर त्यांचे सासर देखील सोनज (मालेगाव) येथीलआहे. गेली ३५ वर्ष नाशिक शहरात त्या कार्यरत आहेत. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, महापौर, आमदार आणि राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मालेगाव येथे त्यांच्या सासरी जल्लोष करण्यात आला.
डॉ. बच्छाव या धुळ्याच्या पालकमंत्री राहिल्या आहेत. काँग्रेसच्या धुळे जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून त्या पक्षातील कार्यकर्त्यांना परिचित आहेत. या परिचयाचा उपयोग त्यांना निवडणुकीची प्रचार यंत्रणा उभी करण्यासाठी होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची मदत त्यांना होईल.
विशेषतः मालेगाव आणि धुळे येथील काँग्रेसच्या परंपरागत अल्पसंख्यांक मतांची विभागणी टाळणे, हे त्यांच्यापुढे आव्हान असेल. त्या दृष्टीने प्रचारातील नेमके मुद्दे आणि देशातील सध्या राजकीय स्थिती याची जाणीव करून देण्यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागतील. या मतदारसंघात मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि सटाणा हे तीन विधानसभा मतदार संघ नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्या दृष्टीने पक्षाच्या इच्छुकांची नाराजी दूर करून त्या प्रचाराला लागणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस नेतृत्वाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांना विश्वासात घेऊन मी प्रचाराला सुरुवात करणार आहे. धुळे हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिलेला आहे. सध्याच्या केंद्र सरकारकडून आणि पंतप्रधान मोदी यांच्या शेतकरी आणि अल्पसंख्यांक समाजाची उपेक्षा करणारी धोरणे राबविली जात आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये भाजपविषयी प्रचंड नाराजी आहे. मतदार नक्कीच काँग्रेसवर विश्वास दाखवून विजयी करतील, असा विश्वास बच्छाव यांनी व्यक्त केला.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.