Dr. Zakir Shaikh News: सध्या राज्यभर गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. त्याची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. या वैशिष्ठ्यांमुळे विविध गणेशोत्सव उपक्रमांची विशेष चर्चा भाविक आणि नागरिकांत असते. नाशिकमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण म्हणून असाच एक गणपती राजकीय नेत्यांत चर्चेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झाकीर शेख आपल्या ममता नर्सिंग होममध्ये गेली एकवीस वर्षे नियमितपणे गणपती बसवतात. या गणपतीचे वैशिष्ठ्ये म्हणजे अल्पसंख्यांक समाजाचे कार्यकर्ते असूनही त्यांनी या हिंदू उत्सवात कधी खंड पडू दिलेला नाही. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांत तो चर्चेत असतो.
रोज सायंकाळी होणाऱ्या गणपतीच्या आरतीला आमदार, खासदार यांसह विविध लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे नेते आवर्जून हजेरी लावतात. आज मंत्री माणिकराव कोकाटे यांसह विविध नेत्यांनी आरती केली. हे सर्वच नेते, कार्यकर्ते प्रत्यक्ष राजकारणात, निवडणुकीत एकमेकांची उणी दुनी काढतात. तसे असले तरीही या कार्यक्रमाला ते आपला पक्ष व राजकीय मतभेद विसरून एकत्र येतात.
या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र करण्यात डॉ. शेख यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी असलेला संपर्क कारणीभूत आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी डॉ. शेख यांचा धर्म कधीच आडवा आलेला नाही. त्यामुळेच हिंदू-मुस्लीम एैक्याचा गणपती म्हणून देखील त्याकडे पाहिले जाते.
नाशिक शहरात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. त्याची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी या मंडळांना रसद पुरवली आहे. काहींनी थेट भाग घेतला. राजकीय कार्यकर्ते अपेक्षा व राजकीय गणिताचा विचार केल्याशिवाय काहीच करीत नसतात. डॉ. शेख यांचा गणेशोत्सव मात्र असा कोणताही विचार न करता गेली एकवीस वर्षे अखंड सुरू आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, आमदार हिरामण खोसकर, माजी महापौर प्रकाश मते, दशरथ पाटील, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संपर्क नेते अजय बोरस्ते, व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे, अशोक सावंत, अनिल चौगुले, डॉ. प्रशांत शेटे या प्रमुख नेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.