Dada Bhuse News: राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी जाहीर झाली. यामध्ये धनंजय मुंडे आणि नाशिकचे दादा भुसे यांना वगळण्यात आले आहे. मुंडे यांच्या विरोधासाठी राजकीय दबाव होता. मात्र भुसे यांचे नाव वगळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जवळपास महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. यामध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती अपेक्षितच होती. या नियुक्तीने भाजपमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे धनंजय मुंडे यांच्या नियुक्तीला मोठा विरोध होता. पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यातही विलंबाचे तेच एक कारण बोलले जाते. मात्र यामध्ये दादा भुसे यांचेही नाव वगळण्यात आले आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांचे नाव नाशिकचे पालकमंत्री म्हणून घेतले जात होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असे त्यांच्याबाबत बोलले जाते. त्यांची नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी नियुक्ती होईल याबाबत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे बहुतांश नेते अंदाज व्यक्त करत होते.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांचे पालकमंत्री पदाच्या यादीत नाव नसल्याने अनेक राजकीय तज्ञांनाही धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना नाशिक अथवा एखाद्या वजनदार जिल्ह्याचा कारभार सोपविला जाईल, अशी अपेक्षा होती. असे असताना त्यांचे नाव पालकमंत्री पदाच्या यादीत नाही.
यामागे काय कारण असावे यावर आता राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विविध पदाधिकारी पक्ष विस्तारासाठी धडपड करीत आहेत. अन्य पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
शालेय शिक्षण मंत्री भुसे यांना पालकमंत्री पद मिळाले नाही. त्याचा फटका आगामी काळात शिवसेना शिंदे पक्षाला नाशिक मध्ये बसू शकतो. गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अधिकात्मविश्वासाने निवडणुकीची तयारी करेल हे स्पष्ट आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार का? हा देखील प्रश्न आहे. ते जर एकत्र येणार असतील तर आता शिवसेना शिंदे पक्षाला त्यांच्यापुढे नमते घ्यावे लागणार अशी चर्चा सुरू आहे. दादा भुसे यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने शिवसेना शिंदे पक्षाची राजकीय घोडदौड संथ होणार हे मात्र नक्की.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.