Nashik News : देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर व सर्वसमान्य नागरिक अडचणीत आला असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. आज (10 जून ) नाशिक राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ वा वर्धापन दिन व रौप्य महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून अनेक विधायक कामे केली. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण, मंडल आयोगाची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महाविकास आघाडीच्या कालवधीतही अनेक विकासाची कामे आपण केली, असे मत समीर भुजबळ यांनी व्यक्त केले.
२० मे १९९९ ला पवार साहेब काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यांच्या सोबत सर्वात प्रथम छगन भुजबळ साहेब काँग्रेस मधून बाहेर पडले. पवार साहेब दिल्लीतून मुंबईत आले त्यावेळी त्यांचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. पक्षाचे नाव काय याबाबत दोन दिवस चर्चा झाली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव निश्चित झालं.
त्यानंतर १० जून १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. केवळ वीस दिवसाच्या काळात सर्व तयारी केली यामध्ये मी स्वतः नियोजनात होतो. पक्षाचे चिन्ह निर्मिती, झेंडा, घटना निर्मिती तसेच नागरिकांची नोंदणी करण्याबाबत सर्व जबाबदारी आपण पार पाडत होतो. माझगाव येथील सहकाऱ्यांना सोबत घेऊन माझगाव येथून नागरिकांची नोंदणी व इतर आवश्यक कागदपत्रे व दस्ताऐवज तयार करण्यात आले असल्याचे त्यानी सांगितले.
निवडणूक आयोगाकडे नोंदणी करत असतांना पक्षाने चरखा या निवडणूक चिन्हाची मागणी केली होती. इथे आयोगाने पक्षाला मान्यता दिली, पण चरखा चिन्ह देण्याची मागणी नाकारली. निवडणूक आयोगाने दुसरं निवडणूक चिन्ह सूचवण्याची सूचना केली. त्यामुळे आता काय ? त्यानंतर घड्याळ या चिन्हाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. पक्षस्थापनेनंतर अवघ्या दोन महिन्या पक्ष सत्तेत आला या आठवणीना त्यांनी उजाळा दिला. तसेच गेली २५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, सध्या देशात महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. चुकीची माहिती पसरवून महापुरुषांची बदनामी सुरु आहे. देशात आणि राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सूड बुद्धीने कारवाई करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वरिष्ठ नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याविरोधात आपल्याला लढा देण्याची गरज आहे.
दरम्यान, सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार आपल्याला निवडून देऊन पवार साहेबांचे हात अधिक बळकट करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सरोज आहिरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार अपूर्व हिरे, विष्णूपंत म्हैसधूने,प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, मधुकर मौले, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, समाधान जेजूरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, ऐश्वर्या गायकवाड, दिलीप नलावडे, सुरेश आव्हाड, धनंजय राहणे, मनिष रावल, जगदीश पवार, कविता कर्डक, समिना मेमन, सुषमा पगारे, बाळासाहेब गीते, सुरेख निमसे, मनोहर कोरडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited by - Rashmi Mane