Nashik Crime : धक्कादायक ! पोलिसांना महिनाभर वेठीस धरलं; 400 कोटींच्या कंटेनर लुटीची तक्रारच निघाली खोटी, सात संशयितांची निर्दोष मुक्तता
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचे प्रकरण खूपच गाजत होते. कंटेनरमध्ये ४०० कोटी रुपयांच्या नोटा असल्याचा आणि दरोडा पडल्याचा दावा अखेर खोटा ठरला असून, फिर्यादी संदीप पाटील यांनी दिलेली तक्रार बनावट असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही संशयितांची नाशिकच्या इगतपुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
फिर्यादी संदीप पाटील याने कोल्हापूर जिल्ह्यातील चोरला घाट परिसरात कंटेनरवर दरोडा पडल्याचा दावा केला होता. या कंटेनरमध्ये जुन्या ४०० कोटी रुपयांच्या नोटा होत्या असा दावा त्याने केला होता. तसेच या घटनेदरम्यान आपले अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रारही त्याने दिली होती. मात्र नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या तांत्रिक तपासात लोकेशन, कॉल रेकॉर्ड, प्रवासाचा मार्ग आणि वेळापत्रकात मोठ्या विसंगती आढळून आल्या. संबंधित कालावधीत अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनंतर कंटेनर लुटीची संपूर्ण कथा बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकील प्रतिभा मगर यांनी तपासाशी संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. प्रकरणातील सर्व बारकावे, तांत्रिक पुरावे आणि सादर केलेली माहिती यांचे सखोल परीक्षण करत दिवाणी न्यायाधीश आर. यू. इंगळे यांनी संशयितांविरोधात ठोस व विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नसल्याचे नमूद केले आणि याप्रकरणातील सातही संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या सात संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता
याप्रकरणी नाशिकच्या घोटी पोलिस ठाण्याच्या पथकाने जवळपास महिनाभर रात्रंदिवस तपास केला. मात्र फिर्यादीने दिलेली तक्रारच बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने. गुजरात, मुंबई, कल्याण येथून संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या किशोर सावला, विराट गांधी, जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, मच्छिंद्र मढवी आणि जनार्दन धायगुडे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.
त्यामुळे मोठ्या गाजावाजात चर्चेत आलेल्या या प्रकरणाचा शेवट मात्र फिर्यादीच्या कथनावरच संशय निर्माण करणारा ठरला आहे. दरम्यान, खोटी फिर्याद देऊन पोलिसांना महिनाभर वेठीस धरणाऱ्या फिर्यादी संदीप पाटील यांच्या गुन्हा दाखल होणार का? पोलिस त्याच्यावर काही कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
